भारतीय संघातील वेगवान गोलंदज असणाऱ्या भुवनेश्वर कुमारला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणारा खेळाडू म्हणून ओळखलं जातं. भुवनेश्वर कुमारने अनेकदा आपलं कौशल्य दाखवत संघाला विजय मिळून दिला आहे. मात्र हवेत चेंडू वळवण्याचं कौशल्य असणाऱ्या या खेळाडूला मागील काही सामन्यांमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

भुवनेश्वरने सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील मोहालीमधील पहिल्या सामन्यात चार षटकांमध्ये ५२ धावा दिल्या. भुवनेश्वरला एकही गडी बाद करता आला नाही. विशेष म्हणजे सामन्याच्या महत्त्वाच्या क्षणी म्हणजेच १९ व्या षटकामध्ये भुवनेश्वरने महागडं षटक टाकलं. सोशल मीडियावर यावरुन भुवनेश्वरला चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. या साऱ्या प्रकरणानंतर भुवनेश्वरची पत्नी नूपूर नागरने ट्रोल्सला खडे बोल सुनावले आहे.

नूपुरने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “सध्या लोक एवढी रिकामटेकडी आहेत आणि त्यांच्याकडे चांगलं करण्यासारखं काहीच नसल्याने ते द्वेष आणि शत्रुत्व पसरवत आहेत. त्यांना माझा इतकाच सल्ला आहे की तुमच्या या वक्तव्यांमुळे कोणालाही काही फरक पडत नाही किंवा तुम्ही असल्या, नसल्याचाही फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही तो वेळ स्वत:वर खर्च करा आणि स्वत:मध्ये सुधारणा करा. अर्थात याची शक्यता कमीच आहे,” अशी पोस्ट नुपूरने इन्स्टाग्रामवर केली आहे. सध्या तिच्या पोस्टचा स्क्रीनशॉट चर्चेचा विषय ठरत आहे.

भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियावरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांमधील पहिल्या सामन्यातील १९ व्या षटकामध्ये १६ धावा दिल्या ज्यात एका वाइडचाही समावेश होता. आशिया चषक स्पर्धेमधील सुपर फोरच्या सामन्यामध्ये केवळ चार धावा देऊन पाच गडी बाद केले होते. मात्र त्यानंतर सलग दोन सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारने शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. याच टीकेला त्याच्या पत्नीने अगदी जशास तसं उत्तर दिलं आहे.

Story img Loader