भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली मालिका ही नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आता आपल्या वागण्यावर थोडा संयम ठेवलेला आहे. मात्र अॅडलेड कसोटीत पंच म्हणून कामगिरी करत असलेले नायजेल लाँग हे नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. चौथ्या दिवसाच्या खेळापर्यंत पंच नायजेल लाँग यांनी भारताविरुद्ध दिलेले ३ निर्णय हे तिसऱ्या पंचांच्या पाहणीत चुकीचे ठरले आहेत.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजीदरम्यान पंच नायजेल लाँग यांनी चेतेश्वर पुजाराला दोनदा तर अजिंक्यला एकदा बाद ठरवलं. मात्र यानंतर दोन्ही खेळाडूंनी डीआरएसचा वापर केला, तिसऱ्या पंचांच्या पाहणीत दोन्ही खेळाडू नाबाद असल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणानंतर नेटीझन्सनी लाँग यांची तुलना वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टिव्ह बकनर यांच्याशी केली. एकेकाळी आपल्या अचुक निर्णयांसाठी प्रसिद्ध असणारे स्टिव्ह बकनर यांनी आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस भारताविरुद्ध अनेक चुकीचे निर्णय दिले होते, यानंतर भारतीय क्रीडा रसिकांचा रोषही त्यांना सहन करावा लागला होता.

पहिले ३ निर्णय चुकीचे दिल्यानंतर दुसऱ्या डावात अखेर चेतेश्वर पुजारा बाद असल्याचा योग्य निर्णय लाँग यांनी दिला. यावरही काही नेटकऱ्यांनी त्यांची फिरकी घेतलीच.

Story img Loader