भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी संघात सलामीची जोडी कोणती असावी, ही चर्चा सध्या जोर धरत आहे. टी२० मालिकेत शिखर धवनने चांगली कामगिरी केली असली, तरी कसोटी संघात मात्र त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. पण असे असले तरीही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये त्यांनाच कसोटी मालिकेत पराभूत करण्याची भारतीय संघाला ही सुवर्णसंधी आहे. सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तीनही क्षेत्रात भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागले. तसेच झेल पकडण्याच्या बाबतीतही खेळाडूंना आपला सर्वोत्तम प्रयत्न करावा लागेल. भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर ऑस्ट्रेलियाच्या संघाला भारत सहजपणे नमवू शकेल, असे तो म्हणाला.
कसोटी संघातून धवनला वगळण्यात आले आहे. याबाबतही धवनने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की मला संघातून वगळले तेव्हा मला थोडे दुःख झाले होते. पण आता मी ते विसरून पुढचा विचार करू लागलो आहे. मला सध्या थोडासा फावला वेळ मिळाला आहे. त्याकडे मी सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. या वेळेत मी माझा खेळ सुधारण्याच्या दृष्टीने आणि स्वतःला शारीरिकदृष्ट्या अधिक तंदुरुस्त ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.