IND vs AUS 4th Test Day 4 Updates in Marathi: भारत-ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधाराने चौथ्या दिवशी रिव्ह्यू घेत सर्वांनाच चकित केलं. भारतीय संघाने पहिल्या डावात ३६९ धावा करत चांगलं पुनरागमन केलं. मोहम्मद सिराज आणि नितीश रेड्डीने चौथ्या दिवशी भारताच्या डावाला सुरूवात केली आणि ११ धावा जोडत भारत सर्वबाद झाला. पण यादरम्यान पॅट कमिन्सने मोहम्मद सिराजबाबत तिसऱ्या पंचांच्या निर्णयाला आव्हान देत सर्वांनाच चकित केले.
चौथ्या दिवशी सामना सुरू झाल्यानंतर तिसरे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स आला. कमिन्सच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्मिथने झेल टिपला. सिराजच्या बॅटची कड घेत चेंडू स्मिथच्या हातात पोहोचला अशी सर्वांनाच खात्री होती. कमिन्सने ऑफ स्टंपच्या बाहेर यॉर्कर बॉल टाकला, जो सिराजच्या बॅटच्या काठाला लागला आणि दुसऱ्या स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथने सोपा झेल घेतला. पण मैदानावरील पंच मायकेल गॉफ आणि जोएल विल्सन यांनी बाद दिलं नाही. त्यांना वाटले की हा एक बम्प बॉल आहे, जो स्मिथने टिपण्याआधीच जमिनीवर आदळला.
त्यानंतर मैदानावरील पंचांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू स्मिथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच जमिनीवर आदळला, त्यामुळे तिसऱ्या पंचांनी सिराजला लगेच नाबाद घोषित केले. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि समालोचक आश्चर्यचकित झाले. मात्र, यानंतर कमिन्सने पुन्हा रिव्ह्यू घेऊन सर्वांनाच चकित केले.
तिसऱ्या पंचांच्या निर्णयाने नाखुश असलेल्या कमिन्सने मैदानावरील पंचांना तिसऱ्या पंचांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारले आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांच्या निर्णयाविरूद्ध पुन्हा डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला आणि डीआरएसची मागणी केली. मात्र, मैदानावरील पंचांनी ऑस्ट्रेलियन कर्णधाराला तिसऱ्या पंचाच्या निर्णयाला आव्हान देऊ शकत नाही असे सांगितले आणि त्यामुळे कमिन्स निराश होऊन परतला.
पण वादग्रस्त निर्णयामुळे यजमान संघाचे कोणतेही नुकसान झाले नाही. पुढच्याच षटकात नॅथन लायनने शतकवीर नितीश कुमार रेड्डीची विकेट घेतली आणि टीम इंडिया ३६९ धावांवर ऑलआऊट झाली. अशाप्रकारे भारताला चौथ्या दिवशी केवळ ११ धावांचीच भर घालता आली. भारताविरुद्ध पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १०५ धावांची आघाडी मिळाली. तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने लंचब्रेकपर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी करत २ विकेट्स घेतले आहेत आणि २५ षटकांत ऑस्ट्रेलियाला केवळ ५३ धावा करण्याची संधी दिली.