अॅडलेड कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करुन ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या मालिकेतला दुसरा सामना १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरीही पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवणं भारताला सोपं जाणार नसल्याचं, माजी कर्णधार रिकी पाँटींगने स्पष्ट केलंय.

“माझ्यामते पर्थच्या मैदानात भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अधिक चांगली कामगिरी करतील. मात्र ऑस्ट्रेलियाला सर्वोत्तम कामगिरी करत पुनरागमन करावं लागणार आहे. ऑस्ट्रेलियाला अॅडलेड कसोटीत आपण कुठे चुकलो हे शोधून त्यावर काम करावं लागणार आहे. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने केलेला खेळ हा अतिशय खराब होता. मात्र यावर मेहनत केल्यास ऑस्ट्रेलियासाठी चांगला निकाल लागू शकतो.” रिकी पाँटींग क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

पहिल्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तग धरता आला नव्हता. अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी काही छोटेखानी भागीदाऱ्या करत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवलं होतं, मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले होते. त्यामुळे आगामी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader