– नामदेव कुंभार
प्रकाशझोतात खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाचा दारुण पराभव झाला ही लज्जास्पद गोष्ट आहे. कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर ती नाराजी व्यक्तही केली. दुसऱ्या डावात एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही ही नाकर्तेपणाची गोष्ट आहे. एकापेक्षा एक दिग्गज फलंदाज असतानाही ही नामुष्की कशी ओढावली. या लाजिरवाण्या पराभवास जबाबदार कोण?
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी बीसीसीआयपासून रवी शास्त्री, पृथ्वी शॉपर्यंत सर्वांना जबाबदार धरलं. काहींनी तर खालच्या पातळीवर जाऊन याला अनुष्का जबाबदार असल्याचा सूर लावला. मूळात पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ कितपत योग्य होता? हा प्रश्न आहे. लागोपाठ अपयशी ठरणारे पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल यांना संधी देणं कितपत योग्य आहे. के. एल राहुलसारख्या अनुभवी फलंदाजाला तुम्ही संघात स्थान का दिलं नाही? असा प्रश्न सतत भेडसावत आहे. याशिवाय सराव सामन्यात आपल्या संयमी आणि आक्रमक फलंदाजीनं सर्वांची मनं जिंकणाऱ्या शुबमन गिल यालाही संघात स्थान दिलं नाही. पण सराव सामन्यात अपयशी ठरणाऱ्या पृथ्वीला संधी देत संघ व्यवस्थापणानं आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली. कारण, पृथ्वीनं आपला खराब फॉर्म येथेही चालू ठेवला. दोन्ही डावात जवळपास एकसारखाच तो बाद झाला अन् तेथूनच खरं तर भारतीय संघ दबावात गेला असावा. पृथ्वी शॉशिवाय गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंतलाही संघाबाहेर ठेवण्यात आलं. साहाकडे तगडा अनुभव आहे. मात्र पंतनं गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
संघ निवडीनंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे भारतीय संघाचं गचाळ क्षेत्ररक्षण होय. विराट कोहलीनं नेतृत्व स्वीकारल्यानंतर भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला होता. अशक्यप्राय झेल घेत भारतीय खेळाडूनं अनेकदा सामने जिंकून दिले. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतानं गचाळ क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या डावात तर अगदी सोपे सोपे झेलही सोडले. लाबुशेनला चार जीवनदान दिले. पृथ्वी, बुमराह यांनी तर सहजसोपे झेल सोडले. याचा फटका भारताला बसला. अन्यथा पहिल्या डावांत ऑस्ट्रेलियाचा संघ फारतर १३० धावांपर्यंत मजल मारु शकला असता. मात्र, भारतीय क्षेत्ररक्षकांनी कांगारुंना खेळण्याची संधी दिली.
संघ-निवड आणि क्षेत्ररक्षणानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा हा फलंदाजीतील अपयश आहे. विराट कोहलीचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रहाणे-पुजारा यांनी पहिल्या डावात छोटेखानी खेळी केल्या मात्र त्यांना मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. दुसऱ्या डावात तर भारतीय फलंदजांनी लाज काढली. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही, ही लज्जास्पद गोष्ट आहे. पहिल्या डावात विराट कोहली दुर्देवीरित्या धावबाद झाला अन् भारताचा डाव कोसळला. दुसऱ्या डावांत तर फक्त ३६ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे सुमार फलंदाजीही भारताच्या पराभवास तितकीच कारणीभूत आहे.
आता २६ तारखेला मेलबर्न येथे दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात वॉर्नरचं पुनरागमन होणार आहे. तर भारत विराट कोहलीविना उतरणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची ताकद वाढणार आहे तर भारत विराट कोहलीविना कमकुवत दिसत आहे. मालिकेत पुनरागमन करायचं असल्यास भारताला दुप्पट आत्मविश्वासानं मैदानात उतरावं लागेल. संघ निवड करताना पुन्हा कसोटी लागणार आहे. दुसऱ्या सामन्यासाठी पृथ्वी शॉला आराम देऊन राहुल अथवा शुबमन गिल यांना संधी द्यायला हवी. तसेच चौथ्या क्रमांकावर रहाणेनं फलंदाजी करावी. पाचव्या क्रमांकावर हनुमा विहारीला पाठवावे. विराट कोहलीच्या जागी रविंद्र जाडेजाला अंतिम ११ मध्ये स्थान द्यावं. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेला फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्हीमध्ये स्वत:ला सिद्ध करायचं आहे. पहिल्या कसोटीतील पराभव बाजूला ठेवून भारतानं नव्या दमानं मैदानावर उतरायला हवं….