IND vs AUS Playing XI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. शुक्रवारी २३ सप्टेंबरला जगज्जेता ऑस्ट्रेलिया व टी- २० मधील आघाडीचा भारतीय संघ एकमेकांना भिडणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा चार गाडी राखून पराभव केल्यावर आजच्या सामन्यात करो या मरोची स्थिती आहे. आज जर भारत अपयशी ठरला तर हा सामनाच नव्हे तर संपूर्ण मालिका भारताच्या हातातून निसटणार हे निश्चित आहे. अशातच भारतीय संघासाठी व क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची वार्ता समोर येत आहे. दुखापतीमुळे बाहेर असणारा जसप्रीत बुमराह आजच्या सामन्यात परतणार हे जवळपास ठरलं आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सामना पाहिल्यास भारताच्या फलंदाजच्या फळीने उत्तम कामगिरी केली होती मात्र सामन्याचा डोलारा सांभाळताना गोलंदाजांची फळी कमकुवत ठरली आणि परिणामी सामना गमवावा लागला. हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू खेळाडूही गोलंदाजीत मार खाताना दिसला. अक्षर पटेल वगळल्यास उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल एकही खेळाडूला उत्तम कामगिरी करता आली नव्हती. अनेकांनी यावरून प्रतिक्रिया देताना बुमराह कधी येणार असे विचारले होते मात्र पांड्या व शर्मा दोघांनीही बुमराहला बरे होण्यासाठी त्याचा यावेळी घेऊ दे अशी प्रतिक्रिया दिली होती. आज जसप्रीत बुमराह पुन्हा संघात दिसणार हे ९९% निश्चित आहे.
आता बुमराह येणार तर कोणाची जागा जाणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे. मागील काही दिवसात सुनील गावस्कर यांच्यासह अनेक क्रिकेटप्रेमींनी सुद्धा उमेश यादव याच्या निवडीवर प्रश्न केला होता. २०१८ नंतर खेळण्याचा अनुभव नसताना उमेशची निवड का केली असेही अनेकांनी विचारले होते. या वादामुळे कदाचित रोहित शर्मा बुमराहला खेळायला घेणार अशी शक्यता आहे.
भारतीय संघाचे नागपुरात आगमन
दरम्यान, भारतीय संघाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे आज ज्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना भरणार आहे त्या मैदानावर भारत सहा वर्षात कधीच हरलेला नाही. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष आहे त्यामुळे भारतीय संघाने उत्तम कामगिरी करणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.