भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि ‘द वॉल’ हे बिरुद मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या राहुल द्रविडने विराट कोहलीला आपला पाठींबा दर्शवला आहे. पर्थ कसोटी सामन्यात विराट कोहली मैदानातील आक्रमक स्वभावामुळे टीकेचा धनी बनला होता. मात्र राहुल द्रविडच्या मते विराट कोहली हा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळ कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. गेल्या काही वर्षभरात कोहली धडाकेबाज खेळी करतोय. त्याची फलंदाजी पाहून अनेक जण त्याची तुलना सचिन, सर डॉन ब्रॅडमन यांच्याशीही करतात.
अवश्य वाचा – विराट कोहलीचा नवीन लूक सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात की नाही?
“जर तुम्हाला कसोटी क्रिकेटमध्ये रुची नसेल तर तुम्ही वन-डे आणि टी-20 क्रिकेट खेळू शकता. वन-डे आणि टी-20 ला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये यशस्वी कसं व्हायचं हे विराटने आतापर्यंत दाखवून दिलं आहे. हे सोपं नाहीये, अनेकांनी प्रयत्न करुनही त्यांना अशी कामगिरी करता आलेली नाहीये. यासाठी तुमचं ध्येय निश्चीत असावं लागतं.” विराटने कोहलीच्या आक्रमक स्वभावाची पाठराखण केली. सध्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-1 ने बरोबरीत असून दोन्ही देशांमधला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरु होत आहे.
राहुल द्रविडकडे भारताच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली काही वर्षांपूर्वी पृथ्वी शॉ च्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषकाला गवसणी घातली होती. “मी माझ्या संघातील प्रत्येक खेळाडूंना सांगत असतो की, क्रिकेट खेळल्याचं खरं समाधान तुम्हाला कसोटी क्रिकेटमधून येईल. कसोटी क्रिकेट हा आव्हानात्मक प्रकार आहे. या प्रकारात खेळाडू म्हणून तुमची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. पाच दिवसांच्या खेळात तुमचा शाररिक, तांत्रिक आणि मानसिक दृष्ट्या कस लागतो”, राहुल द्रविड बोलत होता.
अवश्य वाचा – IND vs AUS : सलामीच्या जोडीला जबाबदारी घ्यावीच लागेल – रवी शास्त्री