भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने Nervous 90 चं चक्रव्यूह भेदत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. पंतने चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर भारतीय संघाच्या धावसंख्येत भर घालण्याचं काम सुरुच ठेवलं. रविंद्र जाडेजासोबत फलंदाजी करत असताना पंतने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला. या शतकी खेळीदरम्यान ऋषभ पंतने काही विक्रमही आपल्या नावावर केले. 2018 साली भारताच्या इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केलेल्या पंतच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक जमा आहे. मात्र यानंतर त्याला अनेकदा नव्वदीत बाद व्हावं लागलं होतं, मात्र आज पंतने जाडेजाच्या मदतीने शतकी खेळी करुन आपलं नाणं पुन्हा खणखणीत वाजवून दाखवलं. या शतकी खेळीचं क्रेडीटही ऋषभने रविंद्र जाडेजाला दिलं आहे.
“याआधीच्या सामन्यांमध्ये मी तळातल्या फलंदाजांसोबत फलंदाजी करत होतो. यावेळी धावा काढणं गरजेचं असल्यामुळे मला नेहमी वेगळा विचार करुन मैदानात उतरावं लागायचं. त्यामुळे आज माझ्या खेळीत कोणता बदल झालाय असं मला वाटतं नाही, फक्त आज मी एका कसलेल्या फलंदाजासोबत मैदानात असल्याचा मला फायदा झाला.” ऋषभ पंत दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर बोलत होता.
अवश्य वाचा – IND vs AUS : द्विशतक हुकलं मात्र पुजाराच्या नावावर विक्रमांचा षटकार
याचसोबत ऋषभ पंतने संघव्यवस्थापनाचंही तितकंच कौतुक केलं. मी ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात येतो तेव्हा मला माझ्या शैलीप्रमाणे मनासारखं खेळण्याची मूभा आतापर्यंत व्यवस्थापनाने दिली आहे. याचा मला फलंदाजीदरम्यान खूप फायदा होतो. याआधी मी दोनदा नव्वदीत बाद झाल्यामुळे थोडं दडपण आलं होतं, त्यामुळे इंग्लंडमध्ये असताना ओव्हलच्या मैदानातली माझी खेळी आठवली आणि मी शतकं पूर्ण केलं. ऋषभ पंत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होता.
अवश्य वाचा – IND vs AUS : जेव्हा कांगारुंना रडवणाऱ्या पुजाराला लॉयन म्हणतो, तुला कंटाळा नाही का येत?