विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. २७ नोव्हेंबर ते १० जानेवारी या कालावधीत होणाऱ्या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याला वगळण्यात आलं असून त्याच्या जागी लोकेश राहुलला संघाचा उपकर्णधार करण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून एका माजी भारतीय क्रिकेटपटूने BCCI आणि निवड समितीचे कान टोचले.
दुखापतीनंतर अद्यार रोहित सामना खेळलेला नाही. पण मला असं वाटतं की जर तो मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी तंदुरूस्त असेल तर त्याने टीम इंडियाकडून खेळायलाच हवं. त्याने नेट्समध्ये सराव केला असला तरी सध्या त्याची दुखापत ५०-५० आहे असं मला समजलं आहे. पण हा केवळ काही दिवसांचा प्रश्न आहे. तो जर तंदुरूस्त असेल तर तुम्हाला त्याला संघात घ्यावंच लागेल”, असं माजी सलामीवीर दीप दासगुप्ता म्हणाला.
एकदा तो तंदुरूस्त झाला की तो खेळण्यासाठी सज्ज असेल. पण अशा परिस्थितीत लोकेश राहुलला उपकर्णधार घोषित करण्याची घाई BCCI आणि निवड समितीने करायला नको होती. रोहितच्या दुखापतीकडे पाहता त्यांना आणखी एखादा आठवडा पाहिलं असतं तर बरं झालं असतं”, असं मत दासगुप्ताने व्यक्त केलं.
“रोहित जर तंदुरूस्त असेल, तर त्याने टीम इंडियाकडून नक्कीच खेळायला हवं यात शंकाच नाही. मयंक अग्रवालची दुखापत फारशी त्रासदायक नसावी असं मला वाटतं कारण त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. पण रोहित जर तंदुरूस्त असेल, तर त्याला संघात स्थान द्यावंच लागेल”, असंही त्याने नमूद केलं.