भारतीय संघाचा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात IPLमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान देण्यात आले, पण धक्कादायकरित्या रोहित शर्माला वगळण्यात आलं. रोहित दुखापतग्रस्त असल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नसल्याचंदेखील समजलं. पण IPLमधील शेवटच्या साखळी सामन्यात मात्र रोहित खेळला. आपण पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचंही त्याने सांगितलं. त्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलं.

“रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये संधी देण्यात आलेली नाही. यावरून बराच वादंग निर्माण झाल्याचे दिसून आलं. पण हे सगळं बाजूला ठेवून सध्या या गोष्टीत समाधान मानायला हवं की रोहित शर्मा तंदुरुस्त आहे. रोहित पूर्ण बरा होण्याआधीच मैदानावर उतरण्याची घाई करतो आहे असं मत काही लोकांनी मांडलं. पण रोहित मात्र स्वतः मैदानावर उतरल्यापासून खूपच चांगला वाटला. त्याने ३० यार्ड वर्तुळाच्या आत आणि सीमारेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण करून दाखवले. त्यामुळे सध्या तरी मला वाटत की तो तंदुरुस्त आहे याचा आपल्याला आनंद वाटला पाहिजे”, असे गावसकर म्हणाले.

“ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोण उपकर्णधार असेल हा सध्या वादाचा मुद्दा नाही. नेट्समध्ये सराव करताना तुम्हाला तंदुरूस्तीबाबत फारसा अंदाज येत नाही. कारण तेव्हा तुमच्यावर कोणतंही दडपण नसतं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या सामन्यात खेळत असता त्यावेळी तुमच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे तेव्हा तुम्ही किती तंदुरूस्त आहात याचा नीट अंदाज येतो. अशा परिस्थीतीत मूळ मुद्दा हा आहे की खेळाडू संघात खेळण्यासाठी सज्ज असायला हवा आणि रोहित पूर्णपणे सज्ज असल्याचं दिसत आहे”, असेही गावसकर यांनी नमूद केले.

Story img Loader