विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसह प्रारंभ होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला वगळल्यामुळे सध्या BCCI, निवडकर्ते आणि विराट कोहली टीकेचे लक्ष्य ठरत आहेत.

नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत रंगणाऱ्या या प्रदीर्घ दौऱ्यासाठी IPLमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे, पण मुंबईचा ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्माने IPLच्या दोन सामन्यात दुखापतीमुळे विश्रांती घेतली होती. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर झाल्यानंतर काही वेळाने रोहित शर्मा फलंदाजीचा सराव करत असल्याचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने पोस्ट केला.

मुंबईच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ पोस्ट झालाय. त्यानंतर रोहित जर तंदुरूस्त असेल तर त्याला जानेवारीपर्यंत चालणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोणत्याच संघात स्थान का देण्यात आलेलं नाही असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे. याचसह काही नेटकऱ्यांना याचा संबंध विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील तथाकथित वादाशीही जोडला असून विराट आणि BCCI गलिच्छ राजकारण करत असल्याचा थेट आरोप केला आहे.

दरम्यान, रोहितची दुखापत सध्या तरी गंभीर वाटत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या संघात रोहितला स्थान देण्यात आलेले नाही. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत BCCIची वैद्यकीय समिती लक्ष ठेवून आहे, अशी माहिती BCCIकडून देण्यात आली आहे.

Story img Loader