IND vs AUS, World Cup: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आपल्या विश्वचषक २०२३च्या मोहिमेला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कर्णधार म्हणून प्रवेश केलेला रोहित शर्मा आता विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार बनला आहे. याआधी मोहम्मद अझरुद्दीन या यादीत पहिल्या क्रमांकावर होता.
८ ऑक्टोबर २०२३ रोजी रोहित शर्माचे वय ३६ वर्षे १६१ दिवस आहे. त्याच्या आधी १९९९च्या क्रिकेट विश्वचषकात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हा विश्वचषकातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार होता. तेव्हापासून सौरव गांगुली, राहुल द्रविड, एम.एस. धोनी, विराट कोहली हे विश्वचषकात कर्णधार झाले पण ते अझरुद्दीनचा सर्वात जास्त वयाचा विक्रम मोडू शकले नाहीत. या यादीत २४ वर्षांनंतर रोहित शर्माने अझरुद्दीनला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.
अझरुद्दीन हा आजपर्यंतचा सर्वात वयोवृद्ध भारतीय कर्णधार होता, १९९९ मध्ये जेव्हा त्याने कर्णधारपद स्वीकारले तेव्हा त्याचे वय ३६ वर्षे १२४ दिवस होते. २००७ क्रिकेट विश्वचषक भारतासाठी एक दुःस्वप्न होते, ज्यात कर्णधार राहुल द्रविड होता, जो २०२३ मध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाबरोबर होता. २००७च्या विश्वचषकात जेव्हा राहुल द्रविडने शेवटच्या सामन्यात कर्णधारपद भूषवले तेव्हा तो ३४ वर्ष ७१ दिवसांचा होता.
कर्णधार म्हणून भारताला एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद मिळवून देणाऱ्या एम.एस. धोनीने २०१५च्या विश्वचषकात शेवटच्या वेळी भारताचे नेतृत्व केले होते. धोनी जेव्हा अखेरच्या विश्वचषकात कर्णधार म्हणून दिसला तेव्हा त्याचे वय ३३ वर्षे २६२ दिवस होते. यानंतर धोनी २०१९चा विश्वचषकही खेळला होता पण त्याआधीच त्याने कर्णधारपद सोडले होते. २०१९ मध्ये कर्णधार विराट कोहली होता.
विश्वचषकातील सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार
३६ वर्षे १६१ दिवस– रोहित शर्मा (२०२३)*
३६ वर्षे १२४ दिवस– मोहम्मद अझरुद्दीन (१९९९)
३४ वर्ष ७१ दिवस – राहुल द्रविड (२००७)
३४ वर्ष ५६ दिवस – श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (१९७९)
३३ वर्ष २६२ दिवस – एम.एस. धोनी (२०१५)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील प्लेईंग ११
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.