टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यासाठी संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु संघातून उपकर्णधार रोहित शर्माचं नाव वगळण्यात आलं होतं. अखेर दोन दिवसांपूर्वी रोहितला कसोटी संघात स्थान मिळालं. वन डे आणि टी २० मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली. टीम इंडिया बुधवारी युएईतूनच थेट ऑस्ट्रेलियात रवाना झाली. पण या संघासोबत रोहित शर्मा मात्र ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला नाही.

रोहित आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगताना दिसत आहे. परंतु रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघासोबत न जाण्याचं कारण काही वेगळंच आहे. भारतीय संघ युएईतून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. पण रोहित मात्र IPL दरम्यान स्नायूंच्या दुखापतीने ग्रासला होता. अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळी करत त्याने आपण फिट असल्याचा पुनरूच्चार केला. परंतु, ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या कार्यक्रमात सुरूवातीला वन डे आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. अशा परिस्थितीत थेट कसोटी मालिका सुरू होण्याआधी रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सध्या रोहित आपल्या कुटुंबासमवेत युएईमध्ये आहे. तेथून तो पुन्हा भारतात दाखल होणार आहे. येथे तो आपल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी विश्रांती घेणार आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तो काही काळ सराव करणास असून फिटनेस चाचणी पार केल्यावर तो कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊन संघात दाखल होणार आहे.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा

Story img Loader