IND vs AUS 4th Test Updates In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नवा पदार्पणवीर खेळाडू सॅम कोन्स्टास याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सॅम कोन्स्टासने बेधडक फलंदाजी करत पहिल्याच कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. कोन्स्टासने ६५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६० धावा केल्या. पण सर्वात जास्त चर्चा झाली ते म्हणजे विराट कोहलीबरोबर झालेल्या धक्काबुक्कीची. यावर कोन्स्टास त्याच्या खेळीनंतर काय म्हणाला, जाणून घ्या.
विराट आणि कॉन्स्टसमध्ये मैदानावर नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियाच्या डावातील दहाव्या षटकानंतर मेलबर्न क्रिकेट मैदानावरील वातावरण तापले. षटक पूर्ण झाल्यानंतर फिल्ड बदलताना विराट कोहली आणि कॉन्स्टस आमनेसामने आले आणि एकमेकांना धक्का लागला. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. प्रकरण शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजासह पंचांना हस्तक्षेप करावा लागला.
ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षीय सॅम कोन्स्टास विस्फोटक फलंदाजी करत होता. पहिल्या 18 चेंडूत त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा आल्या. त्याने आपले सर्व चेंडू जसप्रीत बुमराहविरुद्ध खेळले. बुमराहच्या चौथ्या षटकात कोन्स्टासने पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. या षटकात एकूण १४ धावा त्याने केल्या. ११व्या षटकात त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर १८ धावा केल्या. त्यात एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता.
हेही वाचा – IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
कोन्स्टासने फलंदाजीनंतर विराट कोहलीबरोबर मैदानात झालेल्या धक्काबुक्कीवर वक्तव्य केले आहे. सकाळच्या सत्रात ड्रिंक्स ब्रेक झाला तेव्हा त्याने यावर मत मांडलं. कोन्स्टास म्हणाला, “मैदानावर जे काही घडतं, ते मैदानावर राहतं. मला प्रतिस्पर्धी संघाला टक्कर देत खेळणं आवडतं आणि या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये पदार्पण करण्याशिवाय अजून चांगलं काय असू शकतं.”
हेही वाचा – IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
आपल्या पदार्पणाच्या खेळीवर पुढे बोलताना कोन्स्टास म्हणाला, “हे खूपच अवास्तविक आहे. चाहत्यांची गर्दी पाहा. मी फक्च थोडं मोकळेपणाने खेळण्याचा प्रयत्न केला.” बुमराहविरूद्ध रॅम्प शॉट खेळण्याबाबत कोन्स्टास म्हणाला, “जेव्हा चेंडू येत होता तेव्हाच मी हा शॉट खेळण्याचा विचार करत होतो. त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करायची हे माझं लक्ष्य होतं.”
ऑस्ट्रेलियाचा हा युवा फलंदाज १९ वर्षीय सॅम कोन्स्टासने विक्रमांची रांग लावली. कॉन्स्टास हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मार्क टेलरकडून १९ वर्षे आणि ८५ दिवस वय असताना ही पदार्पणाची कॅप मिळाली.