Sanjay Manjrekar urges India to stop treating Rohit Sharma as VIP : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ चा चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची बॅट आतापर्यंत पूर्णपणे शांत आहे. तो गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित आतापर्यंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. पण मेलबर्न कसोटीत त्याने यशस्वी जैस्वालसोबत सलामी दिली. ज्यामुळे माजी खेळाडू संजय मांजरेकरांनी रोहितबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत पहिल्या डावात सलामीला आला होता, तरीही त्याला धावा करण्यात अपयश आले होते. तो ५ चेंडूत केवळ ३ धावा करून रोहित ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सच्या षटकात झेलबाद झाला. रोहितने चुकीचा पुल शॉट खेळला आणि स्कॉट बोलंडच्या हाती सोपा झेल दिला. अशात माजी भारतीय खेळाडू संजय मांजरेकरांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी रोहित शर्माच्या ओपनिंग स्लॉटमध्ये परतण्याच्या निर्णयावर टीका केली. त्याचबरोबर हे केएल राहुलसाठी अन्यायकारक असल्याचे म्हटले. मांजरेकर म्हणाले की, राहुलने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये सलामी करताना चमकदार कामगिरी केली होती. यशस्वी जैस्वालसोबतची त्याची भागीदारी विक्रमी पातळीवर होती.
संजय मांजरेकर काय म्हणाले?
ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, “भारतीय क्रिकेटमध्ये हे सामान्य आहे की, मोठी नावे फॉर्ममध्ये आणण्यासाठी लहान खेळाडूंचा बळी दिला जातो. हे संघाच्या हिताचे नाही. केएल राहुल हा सध्याचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे, परंतु रोहित शर्माला ओपनिंग स्लॉटमध्ये परत आणण्यासाठी राहुलचा फलंदाजी क्रम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. जो चुकीचा आहे. गेल्या १४ डावांमध्ये रोहितला केवळ १५२ धावाच करता आल्या आहेत. त्याचे शेवटचे अर्धशतक न्यूझीलंडविरुद्ध आलो होते. त्याची मानसिक स्थिती आणि शॉटच्या निवडीतील संघर्ष स्पष्टपणे दिसत आहे.”
संजय मांजरेकरांनी दिले सचिन तेंडुलकरचे उदाहरण –
सचिन तेंडुलकरचे उदाहरण देताना संजय मांजरेकर पुढे म्हणाले, “असे आधीही घडले आहे. सचिनने २०११ च्या विश्वचषकानंतर निवृत्ती घेतली नाही. कारण त्यांना १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम करायचा होता. भारतीय क्रिकेटला आता व्हीआयपी संस्कृतीतून बाहेर पडण्याची गरज आहे.”