India vs Australia 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकल्यास तो वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर २७७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्व गडी गमावून २७६ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर कमिन्स आणि झाम्पाने तीन धावा घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना झम्पा धावबाद झाला. अशा प्रकारे भारतासमोर २७७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ऑस्ट्रेलियन संघ यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावा केल्या. जोस इंग्लिसने ४५ आणि स्टीव्ह स्मिथने ४१ धावांचे योगदान दिले. लाबुशेननेही ३९ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. बुमराह, अश्विन आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
११२ धावांवर ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. स्टीव्ह स्मिथ ६० चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार मारला. मोहम्मद शमीने त्याला क्लीन बोल्ड केले. २२व्या षटकातही शमीचा चेंडू स्विंग होत होता. शमीचा हा चेंडू आदळला आणि स्विंग होऊन आत आला. आधीचा चेंडूही आला पण स्मिथने तो खेळला. पण यावेळी तो हुकला आणि चेंडू बॅटची कड घेऊन लेग स्टंपला लागला. चेंडूचा वेग कमी असेल पण त्याचा स्विंग आणि चेंडूवरचे नियंत्रण अप्रतिम होते.
तत्पूर्वी, भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात लोकेश राहुल भारताचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मैदानात लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे असल्याचे राहुल म्हणाला. या कारणास्तव त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात ऑस्ट्रेलियाविरोधात पंजा उघडणार मोहम्मद शमी एकमेव गोलंदाज ठरला आहे. त्याने आज ऑस्ट्रेलियाची पळताभुई थोडी करत नाकेनाऊ आणले. तसेच, तो मोहालीत पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे.
दोन्ही संघांची प्लेईंग-११
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅडम झाम्पा.
भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.