भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४३ धावांवर आटोपला. शमीने घेतलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताला ऑस्ट्रेलियाला आपल्या आवाक्यात रोखणे शक्य झाले. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. पण शमीने टाकलेल्या अप्रतिम गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा निभाव लागला नाही. शमीने ही कामगिरी करत महान गोलंदाज कपिल देव आणि जहीर खान या दोघांचा विक्रम मोडला.

 

तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाकडे १७५ धावांची आघाडी होती. त्यानंतर चौथ्या दिवशी उपहाराच्या विश्रांतीपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ बाद १९० धावसंख्येपर्यंत मजल मारून २३३ धावांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर मात्र यजमानांनी झटपट गडी गमावले. ऑस्ट्रेलियाने १५ धावांत चक्क ५ बळी गमावले. त्यापैकी ३ बळी शमीने टिपले. या पराक्रमामुळे शमी हा परदेशात एका वर्षात सर्वाधिक गडी बाद करणारा वेगवान भारतीय गोलंदाज ठरला.

सौ. सोनी टेन ३

हा सामना सुरु होण्याआधी शमीने या वर्षात ३४ गडी बाद केले होते. कपिल देवनेही १९८३ साली परदेशात एका वर्षात ३४ बळी टिपले होते. शमीने पहिल्या डावात एकही बळी मिळवला नाही. पण दुसऱ्या डावात ६ बळी टिपत त्याने वर्षात ४० बळी टिपले आणि कपिल देव, जहीर खान आणि इशांत शर्मा यांचा विक्रम मोडला. इशांतने २०११ साली ३८ आणि २०१४ साली ३८ बळी टिपले होते. तर जहीर खानने २००२ साली ३७ बळी टिपले होते.

सौ. सोनी टेन ३

याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी करणारा तो तिसऱ्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज ठरला.

Story img Loader