भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली कसोटी मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या फलंदाजीने चांगलाच घात केला. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय यांचं दोन सामन्यांमधलं अपयश ही भारतीय संघासाठी चिंतेची गोष्ट बनलेली आहे. भारतीय संघाच्या या समस्येवर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी एक उपाय शोधला आहे. थरुर यांनी ट्विट करुन चक्क फिरकीपटू रविचंद्रनन आश्विन आणि मयांक अग्रवाल यांना सलामीला पाठवण्याची सूचना केली आहे.

मुंबईकर पृथ्वी शॉ हा दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. कसोटीतील पराभवापेक्षा पृथ्वीचं संघात नसणं हा संघासाठी मोठा धक्का आहे. अशा परिस्थितीमध्ये आश्विन आणि मयांक अग्रवालला संघात सलामीला फलंदाजीसाठी पाठवता येऊ शकतं का? आश्विन हा शांत डोक्याने खेळणारा खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या या गुणाचा भारताला फायदा होईल असं थरुर म्हणाले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे. पृथ्वी शॉ च्या अनुपस्थितीत मयांक अग्रवाल आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात कोणाला अंतिम 11 जणांच्या संघात स्थान देतो आणि सलामीच्या जोडीचा प्रश्न कसा सोडवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader