ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पावसामुळे १७ षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शिखर धवनने ७६ धावांची खेळी केली, पण ती व्यर्थ ठरली. पण असे असले तरीही त्याने सासुरवाडीत एक विक्रम रचला.
शिखर धवन हा एका वर्षात सर्वाधिक टी२० धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने पाकिस्तानच्या फखर झमानचा विक्रम मोडीत काढला आणि नवा विक्रम प्रस्थापित केला. धवनने आजच्या सामन्यात ७६ धावा करत एकूण ६४८ धावा केल्या. याआधी झमानने याच वर्षात सर्वाधिक ५७६ धावा केल्या होत्या. हा विक्रम शिखरने मोडला.
SHIKHAR DHAWAN: 600+ runs in 16 innings. #AUSvIND pic.twitter.com/vwhCsMzALs
— Cricbuzz (@cricbuzz) November 21, 2018
दरम्यान, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. पण त्यानंतर फलंदाज आपल्या रंगात आले. डार्सी शॉर्ट ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा फाटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेतला आणि २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर अहमद, बुमराने १-१ गडी बाद केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ १६९ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ राहुल १३ धावांवर माघारी गेला. लगेचच कोहलीही ४ धाव करून तंबूत परतला. पण शिखर धवनने एकाकी झुंज देत ७६ धावा केल्या. पण तो झेलबाद झाला. कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची झुंज अपयशी ठरली.