India vs Australia World Cup Final 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली होती. शुबमन गिल अवघ्या ४ धावांवर बाद झाला. यानंतर भारताने ८१ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. शुबमन गिलने सात चेंडूत चार धावा केल्यानंतर तो खराब फटका मारून बाद झाला. त्याने त्याची विकेट ऑस्ट्रेलियाला गिफ्ट केल्यासारखी वाटली.
दुसरीकडे, त्याचवेळी ट्रॅव्हिस हेडने रोहित शर्माचा उत्कृष्ट झेल घेत त्याला तंबूत पाठवले. या स्पर्धेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावणारा श्रेयस अय्यर अंतिम सामन्यासारख्या महत्त्वाच्या सामन्यात फ्लॉप ठरला. या तिघांच्या विकेटने टीम इंडिया अडचणीत आली होती. के.एल. राहुल आणि कोहलीने डाव सावरत अर्धशतकी भागीदारी देखील केली मात्र, त्याला कमिन्सने कोहलीला त्रिफळाचीत केले.
स्टार्कसमोर शुबमन गिल पुन्हा अपयशी ठरला
मिचेल स्टार्कने शुबमनला एक शॉर्ट बॉल टाकला, त्यावर शुबमनने ऑफसाईडवरून तो चेंडू खेचण्याचा प्रयत्न करत खराब फटका खेळला आणि शॉर्ट मिड-ऑनला उभ्या असलेल्या अॅडम झाम्पाच्या हातात सोपा झेल दिला. बाद झाल्यानंतर रोहित चांगलाच संतप्त दिसत होता. शुबमनही स्वत:हून निराश दिसत होता. त्यावेळी त्या फटक्याची आवश्यक नसतानाही त्याने चुकीचा फटका खेळून आपली विकेट गमावली. रोहित दुसऱ्या दुसऱ्या बाजूने चौकार आणि षटकार मारत होता. स्टार्कने एकदिवसीय सामन्यांच्या चार डावात शुबमनला गोलंदाजी दिली आहे. गिलने ४५ चेंडूत ३८ धावा केल्या असून तीन वेळा तो बाद झाला आहे.
आतापर्यंतच्या कारकिर्दीत तीन वेळा स्टार्कने शुबमनला पहिल्या १५ षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. या विश्वचषकात शुबमनला नऊ सामन्यांत ४४.२५च्या सरासरीने ३५४ धावा करता आल्या. हा विश्वचषक त्याच्यासाठी काही खास नव्हता. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. फायनलमध्ये शुबमनकडून खूप अपेक्षा होत्या, कारण अहमदाबादमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. शुबमन आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडूनही खेळतो आणि हे त्याचे घरचे मैदान आहे, मात्र तो अंतिम फेरीत खेळू शकला नाही.
अंतिम फेरीत श्रेयस अय्यर फ्लॉप ठरला
श्रेयस अय्यरला पॅट कमिन्सने यष्टिरक्षक जोश इंग्लिसच्या हाती झेलबाद केले. श्रेयसला तीन चेंडूत चार धावा करता आल्या. नेदरलँडविरुद्ध ९४ चेंडूत नाबाद १२४ आणि न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत ७० चेंडूत १०५ धावा करणारा श्रेयस अंतिम फेरीत फ्लॉप ठरला. १०व्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर श्रेयस मैदानात आला.
या विश्वचषकात जेव्हा तो पहिल्या १० षटकांमध्ये फलंदाजीला आला तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा काढल्या नाहीत. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही श्रेयसला खाते उघडता आले नाही. त्याला इंग्लंडविरुद्धही संधी पहिल्या १० षटकांतच मिळाली होती, पण तो १६ चेंडूंत चार धावा करू शकला. आता अंतिम फेरीत श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला. या विश्वचषकात श्रेयसला ११ डावात ६६.२५च्या सरासरीने ५३० धावा करता आल्या. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
हेडने रोहितला झेलबाद केले
रोहित शर्माने ३१ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १५१.६१ होता. रोहितने मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठीमागे धावताना ट्रॅव्हिस हेडने उत्कृष्ट झेल घेतला. रोहित आणि शुबमनमध्ये ३० धावांची आणि रोहित आणि विराटमध्ये ४६ धावांची भागीदारी झाली.
रोहित आणि शुबमन एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या यादीत सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोघांनी १९९८ मध्ये १६३५ धावांची भागीदारी केली होती. त्याचवेळी रोहित आणि शुबमनने या वर्षात आतापर्यंत १५२३ धावांची भागीदारी केली आहे. यादीत तिसऱ्या स्थानावर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ या ऑस्ट्रेलियन जोडीने १९९ मध्ये १५१८ धावांची भागीदारी केली होती.