IND vs AUS Test Series Shubaman Gill old video: भारतीय संघ नागपुरात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीच्या तयारीत व्यस्त आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांना अजमावणार असून त्यासाठी खूप महत्त्वाची आहे. संघ नागपुरात पोहोचला असून नेटमध्ये घाम गाळत आहे. संघाचा सलामीवीर शुबमन गिलने कसोटी संघात आपले स्थान पक्के केले असून टी२० आणि एकदिवसीय क्रिकेटनंतर तो आता कसोटीमध्ये फटकेबाजी करण्यास सज्ज झाला आहे. या वर्षात गिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. पण आता या वर्षी पहिल्यांदाच कसोटी खेळणार आहे.
श्रीलंका, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या एकदिवसीय आणि टी२० मालिकांमध्ये शुबमन गिल नावाचे अक्षरशः वादळ पाहायला मिळाले. त्यात त्याने आपले न्यूझीलंडविरुद्ध पहिलेवहिले द्विशतक देखील ठोकले. मात्र त्याच शुबमन गिलने आतापर्यंतच्या १३ कसोटी सामन्यांच्या २५ डावात फलंदाजी करताना फार काही विशेष कामगिरी केलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जेम्स अँडरसनच्या चेंडूवर तो कसा त्रिफळाचीत झाला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता गिलचा फॉर्म आणखी एका वेगळ्या टप्प्यातून जात असला तरी आता गिल वेगवान स्विंग कसा खेळतो हे पाहावे लागेल.
गिलचा हा व्हिडिओ भारतात खेळल्या गेलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताला ३-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. ४ कसोटी सामन्यांनंतर भारतीय संघाला कोरोनामुळे पाचव्या कसोटीतून बाहेर पडावे लागले होते, मात्र त्यानंतर पाचव्या कसोटीसाठी शुबमन गिलचाही संघात समावेश करण्यात आला होता. त्या सामन्याच्या दोन्ही डावात अँडरसनने गिलला खूप त्रास दिला आणि त्याला बादही केले. इंग्लंडच्या जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसनने गिलला खूप त्रास दिला. ऑस्ट्रेलियाकडेही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारखे गोलंदाज आहेत, त्यामुळे गिलची कसोटी पाहता येईल.
शुबमन गिलने भारतासाठी १३ कसोटी सामन्यांच्या २५ डावांमध्ये फलंदाजी करत ७३६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३२ आहे जी टी२० आणि एकदिवसीय पेक्षा खूपच कमी आहे. गिलने कसोटीत केवळ एकच शतक झळकावले असून त्याने ४ अर्धशतकांच्या खेळी खेळल्या आहेत. तो सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहे आणि एकदिवसीय आणि टी२० नंतर कसोटीत धूम ठोकण्यासाठी सज्ज आहे.