India vs Australia World Cup Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक हरल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत २४० धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर २४१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारताचा माजी कर्णधार कपिल देव म्हणत आहेत की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनल पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडियावर चाहते कमेंट्स करून आपली मते व्यक्त करत आहेत.
कपिल देव यांना फायनल पाहण्यासाठी आमंत्रण मिळाले नाही…
भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी माजी क्रिकेटपटूंसह अनेक मोठ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक मोठे चेहरे मैदानावर टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसले पण माजी दिग्गज खेळाडू कपिल देव म्हणतात की, त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.
लोक विसरतात- कपिल देव
दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी आज त्यांची व्यथा एका वृत्तवाहिनीवर व्यक्त केली. ते कॅमेऱ्यासमोर म्हणाले, “मी आणि माझ्या १९८३च्या संघातील सर्व सदस्यांना जर बोलावले असते तर अजून बरे झाले असते. पण आज ते इतके व्यस्त आहेत, त्यामुळे ते कदाचित विसरले असतील. माझ्या व्यतिरिक्त असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्यांनी निमंत्रण दिले नाही. मला मान्य आहे की त्यांच्यावर कार्यक्रमाची खूप जबाबदारी आहे, त्यामुळे त्या गडबडीत कधीकधी लोक विसरतात.” आज दुपारपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी ६० षटकांचा सामना असायचा आणि फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाचा भारताला सामना करावा लागला होता. आज भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि ते ऑस्ट्रेलियाला केवळ २४१ धावांचे लक्ष्य देऊ शकले. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५० षटकात २४१ धावा करायच्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्या आहेत. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅव्हिस हेड खेळपट्टीवर खेळत आहेत. भारतीय फलंदाज कोणतीही जादू दाखवू शकले नाहीत. आता संपूर्ण देशाला गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे.