भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टी२० सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने १६. १ षटकात ३ बाद १५३ धावा केल्या होत्या. त्यात मॅक्सवेलने तडाखेबाज खेळी करत २३ चेंडूत ४ चौकरांसह ४६ धावा ठोकल्या.

या सामन्यात एका षटकात मॅक्सवेलला बाद होण्यापासून चक्क मैदानावर लटकणाऱ्या स्पायडर कॅमने वाचवले. कृणाल पांड्या याच्या गोलंदाजीवर मॅक्सवेल फटकेबाजी करत होता. ते करत असताना त्याच्या एका फटक्याचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटला लागून उंच उडाला. चेंडू हवेत उडता क्षणीच मॅक्सवेल बाद होणार हे निश्चित होते, पण ऐनवेळी चेंडू स्पायडर कॅमला लागला आणि चेंडू डेड बॉल ठरवण्यात आला.

दरम्यान, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. पण त्यानंतर फलंदाज आपल्या रंगात आले. डार्सी शॉर्ट ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा फाटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेतला आणि २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १८ चेंडूत ३१ धावा केल्या. सध्या हे दोघे मैदानावर असून पावसामुळे खेळ थांबला आहे.

Story img Loader