Mohammed Siraj Travis Head Fight: भारताचा माजी खेळाडू कृष्णचारी श्रीकांत यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर संतापले आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात ॲडलेडच्या मैदानावर दाखवलेल्या सिराजच्या आक्रमक वृत्तीबाबत श्रीकांत यांनी राग व्यक्त केला आहे. सिराजने गोलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेडला मैदान बाहेर जाण्याचा इशारा दिला होता. श्रीकांत यांन हेडच्या १४९० धावांच्या खेळीचं कौतुक केलं आहे.
यूट्यूब शोमध्ये बोलताना श्रीकांत म्हणाले की, सिराजने हेडचा आदर केला पाहिजे कारण हेड भारतीय गोलंदाजीवर मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करत होता. हेडने १७ चौकार आणि ४ षटकार लगावत सामना भारतापासून दूर नेला होता. अशारितीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात भारतावर १५७ धावांची आघाडी मिळवली होती.
हेही वाचा – Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
श्रीकांत म्हणाले की, “हेडने भारतीय गोलंदाजांची खूप वाईट पद्धतीने कुटाई केली. अरे सिराज, तुला अक्कल नाही का? काय करतो आहेस तू? वेडा झाला आहेस का? त्या फलंदाजाने तुझ्या चेंडूंवर मैदानातील प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी केली आणि तू त्याला आक्रमकता दाखवली. यालाच आपण स्लेजिंग म्हणतो का? काय मूर्खपणा आहे. हा ठार वेडेपणा आहे.”
श्रीकांत पुढे म्हणाले की, “जर एखाद्या फलंदाजाने १४० धावा केल्या तर त्याचे श्रेय मिळाले पाहिजे. त्याच्या खेळीचे कौतुक करायला हवे आणि तुला त्याचा राग येतो. तुम्ही त्याला बाद केल्यानंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन करताय. तू काय म्हणून असं सेलिब्रेशन केलं, तू त्याला १० धावांवर बाद केलंस की शून्यावर? जणू काही तू रणनिती आखून विकेट मिळवली होतीस. त्याने मैदानाच्या अगदी प्रत्येक कोपऱ्यात फटके लगावले. भारतीय गोलंदाजांकडे त्याला रोखण्यासाठी काहीच रणनिती नव्हती. त्याने षटकार लगावले. अश्विनसारख्या फिरकीपटूला साधारण गोलंदाज समजून त्याने क्रीझच्या बाहेर येऊन षटकार लगावला.”
हेही वाचा – एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
सिराज आणि ट्रॅव्हिस हेडच्या वादानंतरआयसीसीने दोन्ही खेळाडूंच्या खात्यात प्रत्येकी १ डिमेरिट गुण जोडला आहे. तर सिराजला अतिरिक्त शिक्षा देत त्याच्या मॅच फी च्या २० टक्के दंड आकारण्यात येत आहे. तत्त्पूर्वी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत १० विकेट्सने विजय मिळवला आहे. मात्र, नंतर सिराज आणि हेडमध्ये सर्व काही ठीक झाले आणि दोघांनीही सामना संपल्यानंतर एकमेकांना गळाभेट घेतली.