भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर यजमानांना कसोटी मालिकेत २-१ असे पराभूत केले. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा ७ गडी राखून पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहते आणि क्रिकेटप्रेमी आनंदी आहेत. पण भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर मात्र काहीसे नाराज असल्याचे दिसले. मालिका विजयनानंतर आयोजकांनी विजेत्या संघाला केवळ ट्रॉफी सुपूर्द केली, पण त्याबरोबर कोणत्याही प्रकारचे रोख इनाम किंवा धनादेश दिला नाही, ही गोष्ट गावसकर यांना चांगलीच खटकली.
सामना संपल्यानंतर सामनावीर युझवेन्द्र चहल आणि मालिकावीर महेंद्रसिंग धोनी या दोघांना बक्षीस म्हणून केवळ प्रत्येकी ५०० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ३५ हजार रुपयांचे इनाम देण्यात आले. ही रक्कम या दोघांनाही दान केली. तसेच विजेत्या संघाला ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ऍडम गिलख्रिस्ट याने केवळ ट्रॉफी सुपूर्द केली. यावर गावसकर प्रचंड भडकले.
या दौऱ्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे आयोजकांनी या मालिकेतून प्रयोजकांच्यामार्फत खूप उत्पन्न मिळवले असणार. मग हे उत्पन्न त्यांनी ज्या खेळाडूंच्या जीवावर मिळवले आहे, त्या खेळाडूंना त्या उत्पन्नाचा वाटा द्यायला नको का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मालिकावीर आणि सामनावीर या दोघांना केवळ ३५ हजार रुपयांचे इनाम देणे म्हणजे अत्यंत कीव करण्याची बाब आहे, अशी टीकाही गावसकर यांनी केली.