Ravindra Jadeja no ball in Indore Test: पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे इंदोरच्या होळकर स्टेडियवर देखील परिस्थिती फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल पाहायला मिळाली. परिणामी बुधवारी (१ मार्च) सुरू झालेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ स्वस्तात गुंडाळला गेला. ऑस्ट्रेलियन संघा देखील दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. पण पाहुण्या संघाने भारतावर ८८ धावांची आघाडी घेतली. मात्र रवींद्र जडेजाच्या नो बॉल वरून भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी चांगलेच त्याला फैलावर घेतले आहे.
भारतीय गोलंदाजांना पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्याच्या अनेक संधी होत्या, पण नशीब टीम इंडियासोबत नव्हते. जडेजाने पहिल्या दिवशी अनेक नो बॉल टाकले. एकदा त्याने लाबुशेनला नो बॉलवर बोल्ड केले. जडेजा हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याने दुखापतीतून उल्लेखनीय पुनरागमन करून कर्णधाराचा विश्वास संपादन केला आहे.
गेल्या वर्षी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर जडेजाला पाच महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागले आणि या वर्षी जानेवारीत त्याला क्रिकेटमध्ये परतण्याची संधी मिळाली. परतल्यावर जडेजाने सौराष्ट्रसाठी रणजी ट्रॉफी सामन्यात आठ विकेट घेतल्या. यानंतर त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले असताना, या मालिकेत खेळाडूला एका मोठ्या आणि नव्या समस्येचा सामना करावा लागत आहे. डावखुरा ऑर्थोडॉक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यापासून अनेक फ्रंटफूट नो-बॉल टाकत आहे. बुधवारी जडेजाने पुन्हा एकदा नो बॉल टाकला. त्याच्या पहिल्या नो बॉलवर भारताला जास्त त्रास झाला नाही, पण दुसऱ्या नो बॉलवर मार्नस लबुशेन क्लीन बोल्ड झाला. मात्र, रिप्लेमध्ये जडेजाने ओव्हरस्टेप केल्याचे दिसून आले.
भारताचे माजी फलंदाज आणि कर्णधार सुनील गावसकर यांनी जडेजाने खूप नो-बॉल टाकल्याबद्दल टीका केली आहे. ते म्हणाले, “हे अस्वीकार्य आहे. त्याला काही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाले आहेत पण फिरकीपटूने असे नो-बॉल टाकणे भारताला महागात पडू शकते. त्याच्यासोबत पारस म्हांबरे (गोलंदाजी प्रशिक्षक)यांनी बसावे आणि सांगावे.” तिसर्या भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत समालोचन करताना गावसकर म्हणाले होते, “जडेजाने लाइन मागून गोलंदाजी करावी. मार्नसने त्या धावा भारताला किती महागात पडू शकतात हे दुसऱ्या डावात कळणार आहे, तो शून्यावर बाद होऊ शकला असता.”
तत्पूर्वी बुधवारी उभय संघांतील हा तिसरा कसोटी सामना सुरू झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला दारून पराभव स्वीकारावा लागला होता. असात तिसऱ्या कसोटीत देखील भारतीय संघ चांगली सुरुवात करेल अशी अपेक्षा होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण फलंदाज संघाला चांगली सुरुवात देऊ शकले नाहीत. सलामीवीरांसह संपूर्ण फलंदाजी क्रम एकापाठोपाट विकेट्स गमावताना दिसला. परिणामी इंदोर कसोटीच्या पहिल्या डावात भारताने अवघ्या १०९ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या.