IND vs AUS Sunil Gavaskar on Jasprit Bumrah injury : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने १४५ धावांची आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सिडनी क्रिकेट मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भाग घेऊ शकेल का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात सुनील गावस्करांनी जसप्रीत बुमराहबद्दल मोठं वक्तव्य केले आहे.
सुनील गावस्कर काय म्हणाले?
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन ही संघासाठी चिंतेची बाब असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, बुमराहने तिसऱ्या दिवशी गोलंदाजी केली नाही तर २०० धावांची आघाडीही सुरक्षित असू शकत नाही. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लाइव्ह टेलिकास्टमध्ये दाखवल्याप्रमाणे बुमराहने टीम डॉक्टर आणि सुरक्षा अधिकाऱ्यासह स्टेडियम सोडले होते. लंच ब्रेकनंतर, वेगवान गोलंदाजाने फक्त एक षटक टाकले, ज्यामध्ये त्याचा वेग कमी होता, आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात विराट कोहलीशी थोडक्यात चर्चा केल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. स्कॅननंतर तो ड्रेसिंग रूममध्ये परतताना दाखवण्यात आले.
‘बुमराह तंदुरुस्त नसेल तर …’ –
सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले, “पहा, जर भारताने आणखी ४० धावा केल्या किंवा १८५ धावा केल्या तर त्यांच्याकडे चांगली संधी आहे, परंतु हे सर्व जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर अवलंबून आहे. जर जसप्रीत बुमराह फिट असेल तर १४५-१५० धावाही पुरेशा ठरु शकतात. पण जर बुमराह तंदुरुस्त नसेल तर २०० च्या आसपासची धावसंख्या देखील पुरेशी असू शकत नाही.”
प्रसिध कृष्णा बुमराहच्या दुखापतीवर काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसिध कृष्णा टीम इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेसाठी आला होता. तेव्हा कृष्णाला बुमराहबद्दल प्रश्न विचारण्यात आला. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत बोलताना प्रसिध कृष्णा म्हणाला, “जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत आहे. तो स्कॅनसाठी गेला होता. वैद्यकीय पथक त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि स्कॅनचा निकाल आल्यावर पुढील गोष्टी आम्हाला कळतील.”