India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला भारतीय संघ २४० धावांवर सर्वबाद झाला. मात्र, या स्पर्धेत पहिल्यांदाच विरोधी संघासमोर टीम इंडिया सर्वबाद झाल्याचे घडले. खरं तर, या स्पर्धेत भारताने सलग १० सामने जिंकून अंतिम फेरी गाठली होती आणि या सर्व सामन्यांमध्ये भारत एकदाही सर्वबाद झालेला नाही.
या स्पर्धेत टीम इंडिया पहिल्यांदाच सर्वबाद झाली
या स्पर्धेतील गट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना सहा विकेट्स राखून जिंकला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताने आठ गडी राखून सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानने दिलेले १९२ धावांचे लक्ष्य सात विकेट्स राखून जिंकले. बांगलादेशविरुद्धच्या चौथ्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला. पाचव्या सामन्यात न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव झाला.
सहाव्या सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना नऊ गडी गमावून २२९ धावा केल्या. सातव्या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर आठ गडी गमावून ३५७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आठव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट्स गमावून ३२६ धावा केल्या होत्या. नवव्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँडला चार विकेट्सच्या मोबदल्यात ४१० धावांचे लक्ष्य दिले होते. तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत (दहावा सामना) भारताने चार गडी गमावून ३९७ धावा केल्या होत्या. हे सर्व सामने भारताने जिंकले होते.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वबाद झाला. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व विश्वचषकांच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर टीम इंडिया १० वेळा सर्वबाद झाली आहे, त्यापैकी सात सामन्यांमध्ये भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना बरोबरीत सुटला. फक्त २०११च्या विश्वचषकात भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना सर्वबाद होऊनही जिंकला होता. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्येही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक जोश इंग्लिश पाच झेल घेऊन विश्वचषकात अशी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक ठरला.