२६ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. मेलबर्नच्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येईल. या सामन्याआधी भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आपण ज्या बचावात्मक पद्धतीने खेळ करुन नंतर खेळपट्टीवर जम बसवला तो पाहता तिसऱ्या सामन्यात मी शतकी खेळी करु शकतो असं अजिंक्यने म्हटलं आहे. तो पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता.

” या कसोटी सामन्यात आम्ही पुनरागमन करु याची मला खात्री आहे. ज्या पद्धतीने मी पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करत आहे, ते पाहता तिसऱ्या सामन्यात मी शतकी किंवा द्विशतकी खेळी करेन असा मला आत्मविश्वास वाटतोय. फक्त शतक झळकावयचं आहे याचा विचार करत राहणं मला टाळायचं आहे. ज्या पद्धतीने मी फलंदाजी करतोय तशाच पद्धतीने मला फलंदाजी करणं सुरु ठेवायचंय. मला परिस्थितीचा अंदाज येतोय, त्यानुसार गरज असेल तर आक्रमक आणि गरज असेल तर बचावात्मक खेळ मी करतोय. असाच खेळ करत राहिलो तर माझ्या संघाला याचा फायदा होईल, वैय्यक्तिक विक्रम नंतर साध्य करता येतात.” अजिंक्यने आपल्या फलंदाजीबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

अवश्य वाचा – IND vs AUS : कोहलीच्या मदतीला राहुल द्रविड आला धावून, म्हणाला विराटसारखं खेळणं सोपं नाही !

या मालिकेत दोन कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नावावर आतापर्यंत १६४ धावा जमा आहेत. गतवर्षी श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे झळकावलेल्या शतकानंतर अजिंक्य एकदाही ३ आकडी धावसंख्या गाठू शकला नाहीये. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचं फलंदाजीतलं अपयश ही मोठी चिंतेची बाब होती. विराट, पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या भारत १-१ अशा बरोबरीत आहे, त्यामुळे तिसऱ्या सामन्यात आत्मविश्वास व्यक्त केल्याप्रमाणे अजिंक्यचा खेळ होतो का आणि भारतीय संघाला त्याचा कितपत फायदा होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader