India vs Australia 2nd ODI: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज के.एल. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्या फिटनेसवर झालेल्या टीकेला उत्तर दिले आहे. वास्तविक, आशिया कप २०२३ सुपर-४ मध्ये राहुलने पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन केले आणि त्याने शानदार शतक झळकावले. यानंतर, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्येही संघाचे नेतृत्व करत असून पहिल्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. आजच्या सामन्यातही त्याने पुन्हा अर्धशतक केले. मात्र, मागील सामन्यात त्याने खराब विकेटकीपिंग केली आणि आजच्या सामन्यात विकेटकीपर इशान किशन आहे. यानंतर राहुलला त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्न विचारले जात असून त्याला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे.
जिओसिनेमाशी बोलताना के.एल. राहुल म्हणाला, “गेल्या दोन वर्षांत संघ व्यवस्थापनाने माझ्यावर खूप विश्वास दाखवला आहे. ते मला अधिक जबाबदाऱ्या देत राहतात, यावरून त्यांचा माझ्या क्षमतेवर विश्वास असल्याचे दिसून येते. यामुळे मला खूप आत्मविश्वास मिळतो आणि मोठी जबाबदारी घेण्याचा आनंदही घेता येतो. त्यामुळे माझे आयुष्य आणि क्रिकेट हे अधिक मनोरंजक झाले आहे.”
के.एल. राहुलने त्याच्या फिटनेसबद्दल हे सांगितले
“सर्वांनी मला आशिया कपमध्ये खेळताना पाहिले आहे, मी सुपर-४ मधील सर्व सामने खेळले आहेत. मी विकेटच्या मागे राहिलो, फलंदाजी केली आणि धावाही केल्या. त्यामुळे माझ्या तंदुरुस्तीबद्दल चिंतित असलेल्या सर्वांसाठी या प्रश्नाचे उत्तर आहे असे मला वाटते. विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया मालिकेसह येत्या दोन मोठ्या महिन्यांत मी असेच चालू ठेवू शकेन अशी आशा आहे.”
राहुल पुढे म्हणाला, “मला माहित होते की जेव्हा मी संघात परतेन तेव्हा मला विकेट्स ठेवून फलंदाजी करावी लागेल. जेव्हा मी फक्त फलंदाजी करतो तेव्हा शारीरिक आव्हाने खूप मोठी असतात आणि मला ते माहीत होते. त्यामुळे मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली. क्रिकेटपटू म्हणून आम्हाला मैदानावर कोणती आव्हाने येतील याची आम्हाला कल्पना आहे. आम्ही प्रशिक्षण आणि सराव सत्रांमध्ये याची तयारी केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा सामन्यात प्रयत्न करत आहोत. गेल्या काही सामन्यात माजी विकेटकीपिंग जरी चांगली झाली नसेल तरी मी तंदुरस्त आहे.”
मधल्या फळीतील फलंदाजीबाबत राहुलचे विधान
मधल्या फळीतील फलंदाजीबाबत राहुल म्हणाला, “मी आयुष्यभर सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. त्या ठिकाणी खेळताना तुम्ही संघाची दिशा ठरवतात. त्या ठिकाणी आपण गेम स्वतः बनवत असतो. जेव्हा तुम्ही पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला माहित आहे की तुम्हाला एक विशिष्ट स्कोअर करणे आवश्यक आहे. तुम्ही शून्यापासून सुरुवात करतात. त्यावेळी विकेट पडण्याचे किंवा आवश्यक रनरेटचे कोणतेही दडपण नसते.”
तो पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता तेव्हा तुमच्यासमोर परिस्थिती वेगळी असते. मग तुम्हाला त्यानुसार वागण्याची गरज असते, एवढाच मोठा फरक आहे. मी नशीबवान आहे की माझ्याकडे मधल्या फळीतील खेळ समजून घेण्यासाठी आणि जुळवून घेण्यासाठी पुरेसे वेळ आणि तंत्र आहे. चौथ्या क्रमांकावर आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे फार वेगळे नाही पण होय, सलामी आणि मधल्या फळीत फलंदाजी करणे यात मोठा फरक आहे.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेबाबत राहुलने दिली ‘ही’ माहिती
के.एल. राहुल म्हणाला, “मला वाटते की ऑसी वर्ल्ड कपमध्ये फेव्हरेटपैकी एक म्हणून येत आहे. त्यांच्याकडे काही महान खेळाडू आहेत, आम्ही काहींसोबत आयपीएल खेळतो आहोत. आम्हाला त्यांच्या खेळीचा अनुभव आहे. ते भारतात खूप वेळा आले आहेत, त्यांना आमच्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती आमच्याइतकीच माहीत आहे. प्रत्येक संघ आपले कौशल्य कसे समोर आणतो याची कसोटी या मालिकेत लागणार आहे. होय, त्यामुळे या मालिकेबद्दल मी खूप उत्सुक आहे. विश्वचषकापूर्वी स्वतःला आव्हान देण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.”