सिडनी वन-डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर ३४ धावांनी मात करुन ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज तग धरु शकले नाहीत. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीचा अपवाद वगळता एकही फलंदाज आपली छाप पाडू शकला नाही. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही या सामन्यात तब्बल ९ विक्रमांची नोंद करण्यात आली.

१००० – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला ऑस्ट्रेलिया संघाचा हा एक हजारावा विजय ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खालोखाल इंग्लंडने ७७४, भारत ७११ आणि पाकिस्तानने ७०२ विजय मिळवले आहेत.

१०,००० – महेंद्रसिंह धोनीने वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : एक धाव आणि धोनी मानाच्या पंक्तीत, वन-डे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पूर्ण

७ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माचं हे सातवं शतक ठरलं आहे. एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ शतकं झळकावली आहेत.

१४ – वन-डे क्रिकेटमध्ये १२५ पेक्षा जास्त धावा काढण्याची रोहित शर्माची ही १४ वी वेळ ठरली. आजच्या सामन्यात रोहितने १३३ धावांची खेळी केली. वन-डे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने १९ वेळा अशी कामगिरी केली आहे. रोहित शर्माने सध्या या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.

४ – पाहुण्या फलंदाजाने एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहितने सर व्हिविअन रिचर्ड्स यांना मागे टाकलं आहे. रिचर्ड्स यांनी ३ शतकं झळकावली आहेत.

२६ – रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत २६ षटकार लगावले आहेत. या कामगिरीसह रोहितने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा २५ षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे.

६४ – रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत ६४ षटकार लगावले आहेत. एखाद्या प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित अग्रस्थानी. त्याने शाहिद आफ्रिदीचा श्रीलंकेविरुद्ध ६३ षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला आहे.

२ – महेंद्रसिंह धोनीचं वन-डे क्रिकेटमधलं हे दुसरं संथ अर्धशतक ठरलं आहे. धोनीने आजच्या सामन्यात ९३ चेंडूत ५० धावा पटकावल्या. याआधी धोनीने विंडीजविरुद्ध २०१७ साली १०८ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.

१ – वन-डे क्रिकेटमध्ये २२ डावांनंतर कोहली एकअंकी धावसंख्येवर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. २०१७ साली चेन्नई वन-डे सामन्यात विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकआकडी धावसंख्येवर बाद झाला होता.

Story img Loader