भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना गमावला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब कामगिरी केली. त्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली याने फलंदाजांना चांगलेच धारेवर धरले आहे. वरच्या फळीतील गोलंदाजांचा हा काही पहिला ऑस्ट्रेलिया दौरा नाही. या आधीही ते ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर क्रिकेट खेळले आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्याने एका मुलाखतीत दिली.

तो म्हणाला की खरे पाहता त्यांचा खेळ हा हळूहळू सुधारायला हवा होता. पण पर्थच्या कसोटीतील त्यांची कामगीरी पाहता तसे अजिबातच वाटत नाही. पुजारा आणि कोहली वगळता इतर कोणीही भरपूर धावा काढत नाहीये. हे संघासाठी अजिबात चांगले नाही. जर भारताला जिंकायचे असेल तर अपयशी ठरलेल्या फलंदाजांनी सुधारणा करायला हवी.

मी विराटला मोबाईलवर संदेश पाठवावा असे मला वाटते. पण मी अजून तसा संदेश पाठवला नाही. मला त्याला सांगावेसे वाटते की भारतीय उपखंडाबाहेर खेळताना भारतीय फलंदाजांनी फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकता कामा नये. नॅथन लॉयन हा नक्कीच उत्कृष्ट फिरकीपटू आहे. शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन आणि ग्राम स्वान हे देखील उत्तम फिरकीपटू होतेच. पण भारतीय फलंदाजांनी फिरकी गोलंदाजीला बळी पडू नये, असे गांगुली म्हणाला.

भारतीय फिरकीपटूंनी नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर खूपच बचावात्मक पवित्रा घेतला. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूंना भारतीयांनी फारच आदर दिला. त्याऐवजी त्यांनी फिरकी गोलंदाजीवर आक्रमक पवित्रा घेऊन खेळायला हवे आणि ३०० ते ३५० धावांचा पल्ला गाठण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे, असा सल्लाही गांगुलीने दिला.

Story img Loader