बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ चे तीन कसोटी सामने खेळले गेले आहेत, पण विराट कोहलीच्या कसोटी शतकांचा दुष्काळ अद्याप संपलेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी अनेक क्रिकेटपंडितांनी भाकित केले होते की, या मालिकेत विराट कसोटी शतकांचा दुष्काळ संपवेल. विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे कसोटी शतक झळकावले. या मालिकेत शतक तर दूरची गोष्ट, विराटला एकदाही ५० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. विराटच्या कसोटी शतकांच्या दुष्काळावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग उघडपणे बोलला आहे.
विराट कोहलीने गेल्या १५ डावांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकही ठोकलेले नाही. त्याच्या फॉर्मची सतत चर्चा होत असते. विराटच्या कठीण काळातही पॉन्टिंग नेहमीच सकारात्मक बोलला आहे. विराटने गेल्या सहा-सात महिन्यांत एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावली आहेत, पण कसोटी शतकाची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. पाँटिंग म्हणाला, “मी या मालिकेतील कोणाच्याही फॉर्मबद्दल विचार करत नाही कारण ही मालिका एक फलंदाज म्हणून दुःस्वप्न ठरली आहे. पहिले दोन कसोटी सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने तिसरा कसोटी सामना जिंकून शानदार पुनरागमन केले.”
पाँटिंग पुढे म्हणाला, “या मालिकेत फलंदाजी करणे किती कठीण होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. हे केवळ टर्निंग विकेटमुळे नाही तर असमान उसळीमुळे होते. जोपर्यंत कोहलीचा प्रश्न आहे तो चॅम्पियन खेळाडू आहे आणि असे खेळाडू स्वतःचा मार्ग तयार करतात. तो सध्या धावा करू शकणार नाही, पण त्याला स्वतःला हे माहीत आहे. कारण एक फलंदाज म्हणून तुम्ही कशात जगत आहात हे तुम्हाला माहीत आहे. मला त्याची काळजी नाही कारण तो पुनरागमन करेल हे मला माहीत आहे.”
‘विराट कोहली चॅम्पियन खेळाडू आहे, तो लवकरच फॉर्ममध्ये येईल’
रिकी पाँटिंग म्हणाला की, विराट कोहली चॅम्पियन खेळाडू आहे, तो लवकरच फॉर्ममध्ये परतेल. तो म्हणाला की “मी अनेकदा सांगितले आहे… तो एक चॅम्पियन खेळाडू आहे, या प्रकारच्या खेळाडूला खराब फॉर्ममधून कसे बाहेर पडायचे हे माहित आहे, या खराब फॉर्मनंतर कसे परत यायचे हे त्याला माहित आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार म्हणाला की विराट कोहली सध्याच्या मालिकेत निराश झाला आहे, त्याने लवकरच फॉर्ममध्ये परतावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मला खात्री आहे की तो लवकरच मजबूत पुनरागमन करेल.” त्याचवेळी विराट कोहलीने दिल्ली कसोटीत एक मोठा विक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावांचा आकडा पार केला.
हेही वाचा: भारतातील खेळपट्टय़ांविषयी इतकी चर्चा का? ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज कॅस्प्रोविचचा सवाल
या मालिकेतील शेवटची कसोटी अहमदाबादमध्ये खेळवली जाणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना ९ मार्चपासून अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. इंदोर कसोटीत भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र टीम इंडिया मालिकेत २-१ने पुढे आहे. इंदोर कसोटीत टीम इंडियाला ९ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाची नजर अहमदाबाद टेस्टमध्ये विजयाकडे असेल. टीम इंडिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ऑस्ट्रेलियन संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. सध्या दोन्ही संघ अहमदाबाद कसोटीसाठी सज्ज आहेत.