IND vs AUS Tim Paine impressed with Dhruv Jurel : भारतीय संघ पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. या संघात युवा खेळाडू ध्रुव जुरेललाही स्थान मिळाले आहे. ध्रुव जुरेलला ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यातील दोन अनधिकृत कसोटी मालिकेतील चमकदार कामगिरीचा फायदा झाला आहे. त्याने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतासाठी ८० आणि दुसऱ्या डावात ६८ धावांचे योगदान दिले होते. आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेनने या युवा यष्टिरक्षक-फलंदाजाचे कौतुक केले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात ध्रुव जुरेल भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरल होता. जुरेल व्यतिरिक्त, अभिमन्यू इसवरन आणि केएल राहुल हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटीत फलंदाज होते. टिम पेन ध्रुव जुरेलचे कौतुक करताना म्हणाला की भारत अ संघातील इतर सर्व खेळाडूंपेक्षा त्याने मला जास्त प्रभावित केले.
ध्रुव जुरेलच्या कामगिरीने टिम पेन प्रभावित –
सेन रेडिओवर बोलताना टिम पेन म्हणाला, “तो (ध्रुव जुरेल) फक्त २३ वर्षांचा आहे आणि त्याने फक्त तीन कसोटी सामने खेळले आहेत, परंतु त्याचा दर्जा इतर सर्व खेळाडूंपेक्षा खूपच चांगला दिसत होता. खरे सांगायचे तर, त्याने वेगाने येणारे आणि उसळी घेणारे चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले, जे इतर भारतीय खेळाडूंच्या दृष्टिकोनातून खूपच वेगळे आहे. या उन्हाळ्यात त्याच्यावर लक्ष ठेवा, मला वाटते की तो ऑस्ट्रेलियन चाहत्यांना खूप प्रभावित करेल.”
त्याच्याकडे कसोटी फॉर्मेटसाठी क्षमता आणि कौशल्य –
टिम पेन पुढे म्हणाला, “तो भारतासाठी काही कसोटी सामन्यांमध्ये यष्टिरक्षक करणारा खेळाडू आहे. त्याने खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी ६३ आहे. त्याला फलंदाजी करताना पाहून हे स्पष्ट झाले की, त्याच्याकडे कसोटी फॉर्मेटसाठी क्षमता आणि कौशल्य आहे. जरी तो मुख्यतः यष्टिरक्षक असला तरी तो मालिकेत कोणत्या भूमिकेत दिसला नाही, तर मात्र मला आश्चर्य वाटेल.”
जुरेल हा यष्टिरक्षक-फलंदाज असून ऋषभ पंतचे कसोटी संघातील स्थान निश्चित झाले आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे सोपे जाणार नाही. आता भारत अ संघासाठी खेळलेल्या त्याच्या दोन डावांनी संघ व्यवस्थापनाला कितपत प्रभावित केले आणि त्याला निव्वळ फलंदाज म्हणून संघात स्थान मिळते की नाही हे पाहायचे आहे. ज्युरेलच्या आंतरराष्ट्रीय आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांच्या चार डावांत ६३.३३ च्या सरासरीने १९० धावा केल्या आहेत.