IND vs AUS Tim Paine criticism of Gautam Gambhir : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. नुकतीच घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ०-३ अशी पराभूत झाल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम इंडियावर सध्या खूप दबाव आहे. मागील वेळेस टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम शास्त्रीचे कौतुक करताना विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.
टिम पेनकडून ऑस्ट्रेलियाचे कौतुक –
टिम पेन सेन पॉडकास्टवर म्हणाला, टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात मागील दोन मालिका जिंकल्या आहेत. त्या दोन्ही वेळेस रवी शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. ते विलक्षण होते . कारण त्यांनी संघात एक उत्तम वातावरण निर्माण केले होते, ज्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड ऊर्जा होती, ते उत्कटतेने भरलेले होते. त्यांनी संघाला स्वप्न दाखवले आणि आनंददायक मार्गाने प्रेरित केले. ज्यामुळे त्यांनी दोन मालिका जिंकल्या. आता भारताला एक नवा प्रशिक्षक मिळाला आहे, जो खूप सडेतोड आणि तापट स्वभावाचा आहे. याचा अर्थ असा नाही की ही चांगली गोष्ट नाही आणि कोचिंगचा एक चांगला मार्ग नाही. पण माझी चिंता अशी आहे की हे भारतीय क्रिकेट संघासाठी योग्य नाही.”
टिम पेनची गौतम गंभीरवर टीका –
टिम पेन म्हणाला, “तुमचा प्रशिक्षक पहिल्याच साध्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत संतापत असेल, तर भारताची पर्थमध्ये चांगली सुरुवात झाली नाही, तर गौतम गंभीरसाठी पुढचा प्रवास कठीण होऊ शकतो.” पेनची ही प्रतिक्रिया गौतम गंभीरच्या झालेल्या पत्रकार परिषदेवर आली आहे. ज्यामध्ये गंभीरने विराट कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल रिकी पाँटिंगच्या टिप्पणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले होते की ऑस्ट्रेलियन दिग्गजाने भारतीय क्रिकेटबद्दल काळजी करण्याची गरज नाही.
टिम पेन पुढे म्हणाला, “मला गौतम गंभीरची प्रतिक्रिया आवडली नाही. हे चांगले लक्षण नाही. कारण मला वाटते की त्याला एक साधा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे असे वाटते की गंभीर अजूनही रिकी पाँटिंगला प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. मी पाँटिंगच्या मतांशीही सहमत आहे. कारण विराटचा फॉर्म खरोखर चिंतेची बाब आहे.”