भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे लहानपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काल मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडीत, अजित आगरकर, बलविंदर सिंह संधू, संजय बांगर यांच्यासारख्या अनेक खेळाडूंची कारकिर्द आचरेकर सरांनी आपल्या हाताने घडवली. या सर्व खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नाव मोठं केलं.

आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. सामना सुरु होण्यापूर्वी आचरेकर सरांना आदरांजली वाहण्यासाठी टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधल्या आहेत. बीसीसीआयने या संदर्भातलं ट्विट केलं आहे.

दरम्यान सिडनी कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीवीर लोकेश राहुल लवकर माघारी परतला असून, यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरुन दिला.

Story img Loader