IND vs AUS 4th Test Travis Head Controversial Celebration Video Viral : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघाला १८४ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर चौथ्या डावात ३४० धावांचे लक्ष्य होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ १५५ धावांवर गारद झाला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. दरम्यान ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने वादग्रस्त पद्धतीने सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात खेळपट्टीवर स्थिरावला होता. तो आपला नैसर्गिक खेळ सोडून बचावात्मक मानसिकतेने फलंदाजी करत होता. पण ट्रॅव्हिस हेडच्या एका चेंडूने त्याला भुरळ पाडली आणि पंत मोठा शॉट खेळायला गेला. या नादात तो सीमारेषेवर झेलबाद झाला. त्याचा झेल मिचेल मार्शने टिपला.
ट्रॅव्हिस हेडचे वादग्रस्त सेलिब्रेशन –
ऋषभ पंतने १०४ चेंडूंचा सामना करत ३० धावा केल्या होत्या. पंत बाद झाल्यानंतर, ट्रॅव्हिस हेडने विचित्र प्रकारे सेलिब्रेशन केले, जे अतिशय घाणेरडे आणि वादग्रस्त हावभाव होते. मात्र, आता या सेलिब्रेशनमध्ये आयसीसी काय भूमिका घेणार हे पाहायचे आहे. कारण याच सामन्यात विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टासमध्ये झालेल्या धक्काबुकीनंतर विराटवर दंड ठोठावण्यात आला होता. त्याच्या मॅच फीच्या २० टक्के कपात करण्यात आली आणि एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला होता. पण ऑस्ट्रेलियन वाहिनी सेव्हन क्रिकेटने यामागचे रहस्य उघड केले आहे. त्यानी सांगितले की, हेडची ही सेलिब्रशन करण्याची जुनी शैली आहे.
टीम इंडियासाठी या डावात केवळ यशस्वी जैस्वालने (८४) सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर जास्त वेळ घालवू शकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंडने प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तसेच नॅथन लायनने २ विकेट्स घेतल्या. या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने आता २-१अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील शेवटचा सामना आता सिडनी क्रिकेट मैदानावर ३ ते ७ जानेवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.