भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १३२ धावांपर्यंत मजल मारली. उस्मान ख्वाजाच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने १७५ धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा डाव २८३ धावांत आटोपला. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची खेळी केली तर नॅथन लॉयनने ५ बळी टिपले. मात्र ऑस्ट्रेलियाच्या डावातील हॅरीसचा उडालेला त्रिफळा चर्चेचा विषय ठरला.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय संथ झाली. फिंचने ३० चेंडूत २५ धावा करत डावाला वेग देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो ‘रिटायर्ड हर्ट’ झाला व तंबूत परतला. त्याच वेळी चहापानाची विश्रांती घेण्यात आली. त्यानंतर अखेरच्या सत्रात बुमराहच्या चेंडूवर हॅरीस २० धावा काढून बाद झाला. हॅरीसने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. पण दुसऱ्या सवात त्याला बुमराहने टाकलेला चेंडू समजलाच नाही. तो चेंडू न खेळण्याचा त्याने निर्णय घेतला आणि त्याच चेंडूने ऑफ स्टंपच्या बेल्सचा वेध घेतला.
Top of off … perfection!#AUSvIND | @bet365_aus pic.twitter.com/FFaYs28zus
— cricket.com.au (@cricketcomau) December 16, 2018
या अप्रतिम चेंडूनंतर सर्वत्र बुमराहची वाहवा झाली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ ट्विट करून त्या चेंडूला play of the day असे गौरवले. दरम्यान, या डावात नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत शॉन मार्श (५), हँड्सकॉम्बही (१३) आणि ट्रेव्हिस हेड (१९) हे गडीदेखील बाद झाले.