भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजयासाठी धावांचे ३१४ आव्हान दिले आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (१०४) आणि कर्णधार फिंचची ९३ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या. स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यानेही ३१ चेंडूत ४७ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या १५ षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला लगाम लावण्यात टीम इंडियाला यश आले. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक ३ बळी टिपले.

या सामन्यात ४२व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जाडेजा आणि धोनी यांनी मिळून एक भन्नाट धाव बाद केला. ३१ चेंडूत ४७ धावा ठोकणारा ग्लेन मॅक्सवेल यावेळी धावबाद झाला. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शाॅन मार्शने फटका मारला व चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा क्षेत्ररक्षक रविंद्र जाडेजाने चपळ क्षेत्ररक्षण करत लगेच चेंडू धोनीकडे फेकला. धोनीनेदेखील चपळाई आणि चलाखी परंतु तो चेंडू यष्टीला न लागता हवेतून पुढे जात होता. धोनीने लगेच आपल्या एका हाताने त्या चेंडूची दिशा बदलली आणि चेंडू थेट यष्टीवर गेला.

धोनीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, आजचा सामना रांची येथे खेळण्यात येत आहे. त्यामुळे ‘लोकल बॉय’ महेंद्रसिंग धोनी याच्या खेळीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या सामन्यात भारताने संघात बदल केलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला आहे. वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलच्या जागी संघात झाय रिचर्डसनला स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी वाढवून मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने आज भारतीय संघ मैदानात उतरला आहे. तर मालिका वाचवण्याची शेवटची आशा म्हणून सामना जिंकण्यासाठी पाहुणा संघ मैदानावर सज्ज आहे.