कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २३५ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे भारताला १५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या डावात आश्वासक सुरुवात करून दिली आणि अर्धशतकी सलामी दिली. राहुलने ४४ धावा केल्या तर विजयने त्याला उत्तम संयमी साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. या दरम्यान विराट कोहलीने दिग्गज क्रिकेटपटूंच्या पंगतीत स्थान मिळवले.

पहिल्या डावात विराट ३ धावांवर बाद झाला होता. या मैदानावर एकेरी धावसंख्येवर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर प्रथमच ओढवली होती. पण दुसऱ्या डावात त्याने अत्यंत संयमीओ सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलियातील आपल्या १००० कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. कोहलीने केवळ ९ कसोटी सामन्यात ही कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरने सर्वाधिक २० कसोटीत १८०९ धावा केल्या. दुसऱ्या क्रमांकावर व्ही व्ही एस लक्ष्मण असून त्याने १५ सामन्यात १२३६ धाव केल्या. तर राहुल द्रविडने १५ कसोटीत ११६६ धावा केल्या. या यादीत आता कोहलीनेही स्थान मिळवले आहे.

Story img Loader