ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे एकदिवसीय क्रिकेटमधील देशांतर्गत वर्चस्व गेल्या चार वर्षांपासून मोडीत काढले. तिसर्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाच चेंडू शिल्लक असताना भारताचा २१ धावांनी पराभव केला आणि मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाचा हा भारताविरुद्धचा एकूण आठवा आणि भारतीय भूमीवरील सहावा एकदिवसीय मालिका विजय आहे. भारताने शेवटची वनडे मालिका २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्या भूमीवर गमावली होती. या विजयामुळे बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील पाहुण्यांच्या २-१ ने पराभवाचे दुःख कमी झाले असेल. या सामन्यात दोन स्टार खेळाडू एकमेकांना भिडल्याचे अनेक वादग्रस्त क्षणही पाहायला मिळाले.
विराट कोहली आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यात झाली शाब्दिक चकमक
खरं तर, भारतीय डावाच्या २१व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस क्रिजच्या दिशेने जात असताना विराट कोहली आणि त्याची टक्कर झाली. यानंतर स्टॉयनिस दुसऱ्या दिशेने पाहू लागला आणि कोहलीने त्याच्याकडे रोखून पाहिले. दोघांमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये कोहली आणि स्टॉयनिस एकाच संघाकडून (RCB) खेळले आहेत.
याआधी ऑस्ट्रेलियाच्या डावातही दोन भारतीय खेळाडूंमध्ये चकमक झाली होती. खरे तर तिसऱ्या वनडेतील पहिल्या डावात कुलदीप यादव ३९व्या षटकात गोलंदाजी करत होता. अॅश्टन अॅगरविरुद्ध अपील भारतीय संघाने अपील केले, पण पंचांनी नॉट आऊट दिले. यानंतर कुलदीपने कर्णधार रोहितला डिसिजन रिव्ह्यू सिस्टम (डीआरएस) घेण्यास राजी केले. रोहितने हसत डीआरएस घेतला.
रोहित आणि कुलदीपही भांडताना दिसले
मात्र, यानंतर अचानक रोहितचे चेहऱ्यावरील हावभाव बदलले आणि तो संतापला आणि कुलदीपला काहीतरी बोलताना दिसला. मात्र, तो कुलदीपला कशासाठी बोलत होता, हे समजू शकलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अॅगरचा निर्णय थर्ड अंपायरनेही बदलला नाही, याचा अर्थ अॅगर नाबाद राहिला. चुकीचा अंदाज वर्तवत कुलदीपने रिव्ह्यूसाठी रोहितकडे हट्ट धरला आणि त्याचा राग त्याला आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रोहितचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील फलंदाजांचे आभार मानत त्याने ४९ षटकात २६९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, अॅडम झॅम्पाच्या (४/४५) घातक गोलंदाजीमुळे भारतीय संघ ४९.१ षटकांत २४८ धावांवर गारद झाला. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये २६ मायदेशात मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. तिन्ही वनडेत १९४ धावा करणारा मिचेल मार्श मालिकावीर ठरला. त्याचवेळी, अॅडम झॅम्पाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.