IND vs AUS Glenn McGrath on Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. यासोबतच माईंड गेम्सही सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ग्लेन मॅकग्रा याने विराट कोहलीच्या खराब फॉर्मचा आणि भावनिक असल्याचा फायदा घ्यावा, असा सल्ला आपल्या संघाला दिला आहे.

मॅकग्राने कोड स्पोर्ट्सला सांगितले की, ‘मी हे नि:शंकपणे सांगू शकतो की तुम्हाला स्वतःला मजबूत ठेलण्यासाठी खूप काही करावे लागेल. विशेषत: ज्या प्रकारे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध ०-३ असा पराभव पत्करावा लागला आहे. त्यावरून ऑस्ट्रेलियाने भारतावर अधिक दबाव आणला पाहिजे.

हेही वाचा – ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम

भारतीय फलंदाज विराट कोहलीची बॅट सध्या शांत आहे. त्याची कसोटी सामन्यातील सरासरी खूपच कमी झाली आहे. गेल्या सहा कसोटीत त्याने २२.७२ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियात कोहलीची सरासरी ५४.०८ आहे.

विराट कोहलीबद्दल मॅकग्रा म्हणाला, ‘जर तुम्ही विराट कोहलीवर दबाव टाकलात, जर तो त्याच्या कामगिरीमुळे त्याच्या भावनांशी लढत असेल आणि तुम्ही त्याला थोडं डिवचलंत तर काय माहित काय होईल. पण माझ्यामते तो (विराट) खूप दबावाखाली आहे. जर सुरूवातीच्या सामन्यांमध्ये त्याने कमी धावा केल्या तर त्याच्यावरचा हा दबाव आणखी वाढेल. विराट खूप भावनिक आहे. जेव्हा तो फॉर्मात असतो तेव्हा तो जबरदस्त खेळतो. पण जेव्हा तो चांगल्या फॉर्मात नसतो तेव्हा तो संघर्ष करत असतो.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?

ग्लेन मॅकग्राशिवाय माईकल क्लार्कनेही हेच सांगितले की भारतीय संघासाठी विराट कोहली खूप महत्त्वाची भूमिका बजावणारा खेळाडू असणार आहे. क्लार्क म्हणाला, भारतीय संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर पुन्हा कब्जा करायचा असेल, तर विराट कोहली हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असेल. या मालिकेत विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या तर टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकू शकते.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका किमान ४-० ने जिंकावी लागेल. जे टीम इंडियासाठी सोपे काम नसेल. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारतीय संघ ५८.३३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, पण टीम इंडियाचे दुसरे स्थानही धोक्यात आले आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्क्यांसह अव्वल स्थानी आहे आणि सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे.