Virat Kohli Catch in IND vs AUS Sydney Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सिडनीत खेळला जात आहे. या सामन्यातील भारताच्या पहिल्या डावाच्या पहिल्या चेंडूवर जेव्हा विराट कोहलीला जीवनदान मिळाले, तेव्हा तो त्याचा पुरेपूर फायदा उठवेल असं वाटत होते. मात्र, असं काही घडलं नाही. त्या जीवदानानंतर विराट कोहली बराच वेळ खेळपट्टीवर होता. पंरतु तो दुसऱ्या सत्रात त्याच गोलंदाजाचा बळी ठरला, ज्याच्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळाले होते. त्यामुळे विराटने प्रत्येकवेळी एकाच पद्धतीने बाद होत चाहत्यांची निराशा केली.
सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहलीने ६९ चेंडूंचा सामना केला, मात्र त्यावर तो केवळ १७ धावा करू शकला. त्याची विकेट स्कॉट बोलंडने घेतली. बोलंडच्या चेंडूवर विराटचा झेल तिसऱ्या स्लिपमध्ये या कसोटीत पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्यू वेबस्टरने पकडला. अशा प्रकारे, शून्यावर जीवनदान मिळाल्यानंतर विराटला त्याच्या धावसंख्येत केवळ १७ धावांची भर घालता आली. विशेष म्हणजे या डावात कोहली त्याच पद्धतीने आऊट झाला, ज्याप्रकारे तो या मालिकेत होत आला आहे.
विराटसोबत ८ पैकी ७ वेळा असं घडलं –
सिडनी कसोटीत विराट कोहली ज्या प्रकारे बाद झाला, ते बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं नाही. खरं तर, विराट आतापर्यंत त्याच्या ८ डावांपैकी ७ वेळा अशा पद्धतीने बाद झाला आहे. किंबहुना, सिडनीमध्येही तो ऑफ साईडला बाहेर जात असलेल्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला, जो वारंवार याच पद्धतीने आऊट झाला आहे.
u
विराट बाद झाल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या –
रोहित शर्मा सिडनी कसोटीत खेळत नाहीये. अशा परिस्थितीत संघाचा सर्वात वरिष्ठ खेळाडू म्हणून विराटकडून अपेक्षा होती. पण ती आशा धुळीस मिळाली. विराट कोहलीने गिलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली पण वैयक्तिकरित्या तो कोणतेही मोठे योगदान देऊ शकला नाही. विराट कोहलीनेही आपली विकेट गमावून टीम इंडियाला अडचणीत आणले आहे. तो बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या ४ विकेटवर केवळ ७२ धावा होती, ही चिंताजनक स्थिती आहे.