ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा दुसरा डाव सर्वबाद ३०७ धावांत आटोपला. फिरकीपटू नॅथन लॉयन याने १२२ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद करत भारताच्या धावसंख्येला लगाम लावला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी ३२३ धावांचे आव्हान मिळाले. या डावात भारताकडून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी अर्धशतके ठोकली. लोकेश राहुल, विराट कोहली आणि ऋषभ पंत या तिघांना चांगली सुरुवात मिळाली, पण त्याचे मोठ्या धावसंख्येचा रूपांतर त्यांना करता आले नाही.
लॉयनच्या गोलंदाजीवर ऋषभ पंत मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याबाबत बोलताना भारताचा माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण म्हणाला की ऋषभ पंत हा नवोदित खेळाडू आहे.पण त्याला त्याच्या खेळीत बचावात्मक फटके कसे खेळावेत याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. कारण तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये एकसारखेच खेळू शकत नाही. सामन्याचे ठिकाण, गोलंदाज, खेळाचा फॉरमॅट आणि सामन्याची स्थिती यानुसार खेळाडूने फलंदाजीतील फटके ठरवले पाहिजेत, असे तो म्हणाला.
ऋषभ पंतच्या खेळीत बचावात्मक फटके दिसत नाहीत. मी त्याला १९ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळत असल्यापासून पाहत आहे. तो बचावात्मक फटके खेळण्यात खूपच असमर्थ ठरताना दिसतो. पण चांगली कारकीर्द घडवायची असेल, तर कसोटी क्रिकेटची फलंदाजी पंतला शिकावी लागेल, असेही लक्ष्मण म्हणाला.