– नामदेव कुंभार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला आपल्या साधारण यष्टिरक्षणामुळे अनेकदा टीकेला सामोरे जावं लागते. सध्या सुरु असलेल्या भारत -ऑस्ट्रेलिया मालिकेतही पंतला या टीकेचा सामना करावा लागला. तिसऱ्या कसोटी सामन्यात सोडलेले झेल आणि दाखविलेला चपळतेचा अभाव यामुळे ऑस्ट्रेलिया-भारतीय संघाच्या माजी खेळाडूंनी पंतची लाज काढली. पंतनं दुखापतीनंतर मैदानात फलंदाजीला उतरत एकप्रकारने स्वत:चं महत्व पटवून दिलं आहे. सध्याच्या भारतीय संघात ऋषभ पंत हा एकमेव खेळाडू आहे जो चौथ्या डावातही शतक झळकावू शकतो. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतनं हेजलवूड, स्टार्क, कमिन्स आणि नॅथन लायनसारख्या दर्जेदार गोलंदाजांचा यशस्वी सामना करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या.

पंतला आपल्या यष्टीरक्षणाच्या शैलीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबत कोणतेही दुमत नाही. कोणी जन्मजात दर्जेदार यष्टीरक्षक नसतं. धोनीही नव्हता. सुरुवातीला धोनीकडूनही अनेक चुका झाल्या आहेत. पण धोनीनं त्यावर काम केलं अन् जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक झाला. पंतने धोनीकडून ही गोष्ट शिकायला हवी. लॉकडाउनच्या काळात पंतने आपल्या फलंदाजीत बरीच सुधारणा केली आहे. पंतनं आपल्या यष्टीरक्षण आणि चपळतेवरही काम करायला हवं. यष्टीरक्षणात चुका होत असल्या तरीही पंत एक प्रतिभावान आक्रमक फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नसावी. तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतनं अतिशय खराब यष्टीरक्षण केलं. त्यावरुन त्याच्यावर टीकेची झोडही झाली. मात्र, पंतं एखाद्या योद्ध्याप्रमाणे दुखापतीनंतरही संघाला गरज असल्यामुळे मैदानात उतरला. पहिल्या डावात फलंदाजी करताना पंत दुखापतग्रस्त झाला होता. दुसऱ्या डावात भारतीय संघाची अवस्था खराब झाली होती. त्याचवेळी पंत एखाद्या योद्ध्याप्रमाणे मैदानात उतरला.

पंत फक्त मैदानातच उतरला नाही तर भारतीय संघाला जिंकण्याच्या आशा पल्लवीत करुन गेला. दुर्देवीपणे त्याला आपलं शतक झळाकावता आलं नाही. ९७ धावांवर पंत बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर पाचव्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात पंत मैदानावर आला होता. मैदानावर आल्यानंतर पंतनं पुरसा वेळ घेतला अन् त्यानंतर त्यानं आपल्या आक्रमक अंदाजात कांगारुंची धुलाई करायला सुरुवात केली. पाहता पाहता अर्धशतक केलं. त्यानंतर शतकाकडे आगेकूच केली. पुजारासोबत शतकी भागिदारी केली. पंत-जाडेजा जोडीची फलंदाजीपाहून ऑस्ट्रेलियाचा संघाही दबावात आला होता. भारतीय संघ सामना जिंकेल असेच प्रत्येकाला वाटत होतं. मात्र, पंत बाद झाल्यानंतर सर्वच समिकरणं बदलली.

दुखापतीनंतर मैदानात उतरत पंतनं भारतीय संघावरील दबाव कमी केला. त्याच्या या धाकडपणामुळे सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंत एखाद्या संकटमोचकाप्रमाणे भारतासाठी धावून आला. त्यानं कसोटी वाचवण्याऐवजी धावा करण्याच्या उद्देशाने खेळ केल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला. एखाद्या योद्ध्याप्रमाणे तो लढला. तिसऱ्या कसोटी सामन्यात पंतनं यष्टीरक्षणात गमावलं पण फलंदाजीत कमावलं आहे, असेच म्हणावं लागेल.

(namdeo.kumbhar@loksatta.com)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus web exclusives rishabh pant in sydney he lived by the sword and died by it india vs australia india tour australia special blog by namdeo kumbhar nck