भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत आणि त्याआधी खेळाडूंमध्ये परस्पर वाकयुद्ध सुरू झाले आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथने नुकतीच भारतात टूर गेम्स न खेळण्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली होती आणि आता अश्विननेही त्याचे उत्तर दिले आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी स्मिथ अशा प्रकारची विधाने करून मनाचा खेळ खेळत असल्याचे त्याने म्हटले आहे.
कांगारू संघाला ९ फेब्रुवारीपासून पहिला कसोटी सामना खेळायचा आहे पण त्याआधी संघ एकही सराव सामना खेळणार नाही. त्याऐवजी ऑस्ट्रेलियन संघ अलूर येथे सराव शिबिर लावून सराव करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या काही दिग्गजांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या, पण स्टीव्ह स्मिथने सराव सामन्यांची अनुपस्थिती योग्य ठरवली. स्मिथच्या मते, “भारत अशा खेळपट्ट्या तयार करतो, ज्या सामन्यांच्या खेळपट्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. गेल्या वेळी आम्ही गेलो होतो तेव्हा मला खात्री आहे की आम्हाला सराव करण्यासाठी ग्रीन-टॉप देण्यात आला होता आणि त्याचा काहीही अर्थ नव्हता.”
अशी विधाने करणे ही ऑस्ट्रेलियाची जुनी सवयचं आहे – अश्विन
स्टीव्ह स्मिथच्या या वक्तव्यावर रविचंद्रन अश्विन याने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला की, “ ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱ्यात यावेळी कोणताही सराव सामना खेळत नाही आहे पण ही काही नवीन गोष्ट नाही. भारत जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो तेव्हाही ते सराव सामने खेळत नाहीत. भारताचे वेळापत्रक अतिशय व्यस्त आहे आणि त्यामुळे सराव सामने खेळणे शक्य नाही.”
काय म्हणाला होता स्टीव्ह स्मिथ?
स्मिथने सांगितले की, २०१७ च्या मालिकेदरम्यान, त्याला सरावासाठी ब्रेबॉर्न येथे हिरवी खेळपट्टी मिळाली होती, तर पहिल्या कसोटी सामन्यातील खेळपट्टी याच्या अगदी उलट होती. पुण्याची खेळपट्टी तर जणू काही कुस्तीचा आखाडा होता. आम्हीही त्यांना आमच्या देशात त्यांना हिरवी खेळपट्टी देऊ शकलो असतो पण आम्ही तसे केले नाही.” यावर अश्विन म्हणाला की, “ऑस्ट्रेलियन संघ आपल्या माइंड गेमसाठी ओळखला जातो आणि मालिकेपूर्वी स्लेजिंग करतो. हे एक त्याचे धोरण असून अशाप्रकारचे डावपेच ते नेहमी वापरतात.”
भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीला नागपुरात होणार आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर अश्विन पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळत असाल, तेव्हा तुम्ही त्या देशात एका महिन्यापेक्षा जास्त काळ राहू नका, हॉटेलमध्ये चांगल्या सुविधा मिळाल्यानंतरही तुम्ही थकून जाऊ शकता. या कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघ घाबरला आहे. भारताकडून कसोटी खेळणे किती कठीण असते हे त्याला माहीत आहे. त्यामुळेच ते अशी विधाने करत आहेत.”