तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या वनडेत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मिचेल स्टार्कने जबरदस्त स्पेल टाकत नवव्यांदा ५ विकेट्स घेतल्या. सलामीवीर मिचेल मार्श (नाबाद ६६) आणि ट्रॅविस हेड (नाबाद ५१) यांच्यातील १२१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सामन्यानंतर, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर भारतीय कर्णधार म्हणाला की बुमराहची दुखापत आणि त्यानंतरची त्याची अनुपस्थिती ही संघाला सवय झाली आहे.
रोहित शर्मा म्हणाला, “जसप्रीत बुमराह आता आठ महिन्यांहून अधिक काळ संघापासून दूर आहे. लोकांना आणि टीमला आता त्याची सवय झाली आहे. मात्र, बुमराहची जागा भरणे खूप अवघड आहे. तो कुठल्या दर्जाचा गोलंदाज आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण आता तो आपल्यासाठी उपलब्ध नाही. आता याचा विचार करू नये. लवकरच तो संघात पुनरागमन करेल अशी देवाकडे प्रार्थना करतो.”
भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “आम्हाला हा विचार सोडून पुढे जायचे आहे आणि इतरांनी चांगली जबाबदारी घेतली आहे. (मोहम्मद) सिराज, (मोहम्मद) शमी, शार्दुल (ठाकूर). आमच्याकडे उमरान (मलिक) आणि जयदेव (उनाडकट) देखील आहेत. गेल्या एका वर्षांत जर नजर टाकली तर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थित हे गोलंदाज तयार झाले आहेत. बुमराह भारताकडून शेवटचा सप्टेंबर २०२२ मध्ये खेळला होता. मागील काही वर्षांपासून त्याच्या पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता.”
रोहित शर्माने सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये कबूल केले की भारतीय फलंदाज फलंदाजी करताना एकही चेंडूवर स्वत:ला सांभाळू शकत नाहीत. नेहमी मोठे फटके मारण्यावर भर दिला.” तो पुढे म्हणाला, “हे निराशाजनक आहे. त्याबद्दल शंका नाही. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही. आम्ही मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरलो, एक संघ म्हणून स्वतःला सिद्ध करू शकलो नाही. एवढ्या धावा पुरेशा नसतात हे आम्हाला आधीच माहीत होते. कोणत्याही प्रकारे ती ११७ धावंची खेळपट्टी अजिबात नव्हती.” असे म्हणत त्याने चूक मान्य केली.
पाठीवर शस्त्रक्रिया झाली
बुमराहची नुकतीच न्यूझीलंडमध्ये शस्त्रक्रिया झाली. बुमराहची शस्त्रक्रिया डॉ. रोवन स्कॉटन यांनी केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांचे पुनरागमन कधी होते हे पाहावे लागेल. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर बुमराहला दुखापत झाली होती. यानंतर तो भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत परतला पण त्याला पुन्हा दुखापत झाली. तेव्हापासून तो संघाबाहेर धावत आहे. आता तो किती दिवस तंदुरुस्त राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.