India vs Australia World Cup Final 2023: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सने जेव्हा विराट कोहलीला बाद केले तेव्हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १ लाख ३० हजार प्रेक्षकांमध्ये पूर्ण शांतता होती. मैदानात कोणीच बसले नाही असे वाटत होते. पॅट कमिन्सने समर्थकांच्या या शांततेची खिल्ली उडवली असून भारतीय चाहत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. विराट बाद झाल्यानंतर प्रेक्षकांची शांतता हा सामन्यातील सर्वात आनंददायी क्षण असल्याचे त्याने सांगितले.
रविवारी अहमदाबाद येथे सहाव्या एकदिवसीय विश्वचषकात आपल्या देशाचे नेतृत्व करत विश्वचषक जिंकणारा पॅट कमिन्स पाचवा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. कमिन्सने कबूल केले की, तो पुन्हा एकदिवसीय फॉरमॅटच्या प्रेमात पडला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने अहमदाबादमधील साबरमती नदीवरील क्रूझ बोटीवर आयसीसी विश्वचषक ट्रॉफीबरोबर काही फोटो काढले.
विराट ५४ धावा करून भारताचा डाव पुढे नेत होता. विराटने कमिन्सकडून अतिरिक्त बाऊन्स चेंडू कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या काठावर जाऊन स्टंपला लागला. सामन्यानंतर कमिन्सला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विचारले की, “विराट आऊट झाल्यावर जे वातावरण निर्माण झाले, ते सर्वात अप्रतिम क्षण होते का? तर यावर कमिन्स म्हणाला, “हो, मला तसं वाटतं. त्यावेळी जी शांतता पसरली होती ती पाहून आम्हाला खूप आनंद झाला, त्यावेळीची शांतता अनुभवण्यासारखी होती. विराट जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा असे वाटत होते की हा एक दिवस असेल जेव्हा विराट नेहमीप्रमाणे शतक ठोकेल.”
कमिन्स पुढे म्हणाला, “या विश्वचषकात मी पुन्हा एकदा वनडेच्या प्रेमात पडलो. मला वाटते की अशा स्पर्धेत प्रत्येक खेळ महत्त्वाचा असतो. द्विपक्षीय मालिकांमध्ये परिस्थिती वेगळी असते. मात्र, विश्वचषकाचा इतिहास खूप मोठा आहे, मला खात्री आहे की तो बराच काळ टिकेल.” मार्चमध्ये भारत दौऱ्यात कमिन्सने त्याची आई गमावली, त्यामुळे त्याला हा दौरा कमी करावा लागला. तो परतला आणि त्यानंतर त्याने देशाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून दिले, प्रतिष्ठित अॅशेस जिंकली आणि आता क्रिकेटची सर्वोत्कृष्ट स्पर्धा म्हटली जाणारी स्पर्धा जिंकली.
कमिन्स म्हणाले, “हे वर्ष ज्या प्रकारे पार पडले त्याचा मला अभिमान आहे.” कमिन्सने सहकारी खेळाडूंनी केलेल्या योगदानाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, “मला माहित आहे की माझे कुटुंब घरी हे सर्व पाहत आहे. नुकताच वडिलांचा निरोप आला की त्याने हा सामना पहाटे ४ वाजता उठून पाहिला. विजयामुळे तो खूप उत्साहित आहे. खेळण्यासाठी तुम्ही खूप त्याग करता. संघातील प्रत्येकाने यावर्षी संघाबरोबर बराच वेळ घालवला आहे, परंतु आम्ही या क्षणासाठी खूप काम करतो. प्रत्येकाची स्वतःची वेगळी कथा आहे, परंतु आमच्या संघामध्ये खूप कष्ट करणारे खेळाडू आहेत.”
कमिन्सच्या हॉटेलमधून त्याला निळ्या रंगाचे कपडे घातलेले भारतीय समर्थक स्टेडियमच्या दिशेने जाताना दिसले. हे दृश्य पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू नक्कीच थोडे घाबरले होते. कमिन्स म्हणाला, “मला नेहमी असे म्हणायला आवडते की मी खूप रिलॅक्स आहे, पण फायनलच्या सकाळी मी थोडा घाबरलो होतो. नुसत्या फेऱ्या मारत होतो, सामना सुरू होण्याची वाट पाहत होतो. हॉटेलबाहेर निळ्या जर्सी घातलेल्या चाहत्यांची गर्दी होती. बाहेर सेल्फी कॅमेऱ्यांनी उभ्या असलेल्या गाड्या पाहून आपण एका खास सामन्याला जाणार आहोत हे कळलं.” तो पुढे म्हणाला, “नाणेफेकसाठी बाहेर पडणे आणि एक लाख ३० हजार निळ्या भारतीय जर्सी पाहणे हा एक अनुभव आहे, जो तुम्ही कधीही विसरणार नाही. त्यातील एक चांगली गोष्ट म्हणजे ते बहुतेक वेळा गोंगाट करत नव्हते. कमिन्सने ट्रॅविस हेडचे कौतुक केले आणि म्हटले, “ट्रॅविस हेडने शानदार खेळी खेळली. याचे श्रेय अँड्र्यू मॅकडोनाल्ड आणि जॉर्ज बेली यांनाही बरेच द्यायला हवे. हेडचा संघात समावेश करायचा यावर त्यांचा ठाम विश्वास होता. जखमी आणि अनफिट हेडचा संघात समावेश होताच, या निर्णयाचा उलटसुलट परिणाम होण्याची शक्यता होती, पण आता सर्व काही ठीक आहे.”