IND vs AUS 1st test Updates in Marathi: भारतीय संघाने फिरकीपटू म्हणून आर अश्विन आणि रवींद्र जडेजापेक्षा वॉशिंग्टन सुंदरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देत सर्वांनाच चकित केले. म्हणजेच या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना वगळण्यात आले आणि हा अत्यंत धक्कादायक निर्णय होता. कदाचित जडेजाला वगळले जाईल आणि अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असे मानले जात होते, परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने दोघांनाही वगळण्याचा निर्णय घेतला आणि सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. पण या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.
रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे दीर्घ काळापासून कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग आहेत आणि टीम इंडियाने त्यांच्याशिवाय कसोटी सामन्यात मैदानात उतरल्याचे फार कमी प्रसंग आले आहेत. भारतीय संघ या दोघांशिवाय कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताना गेल्या १० वर्षात केवळ ५व्यांदा असं घडलं. ३ वर्षांपूर्वी म्हणजे २०२१ ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गाबा कसोटी सामन्यात अश्विन-जडेजाची जोडी नव्हती. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला होता.
अश्विनने ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या अखेरच्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांना अश्विनच्या फिरकीने खूपच सतावलं होतं. पण वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत जी कामगिरी केली होती, ती पाहता सुंदरला संधी देणं हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडू शकतो.
पर्थ कसोटी सामन्यात अश्विन आणि जडेजाला वगळून टीम इंडियाने वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज म्हणून समावेश केला. सुंदर हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे, ज्याच्याकडे मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे. नितीश रेड्डी आणि हर्षित राणा यांनीही या सामन्यातून पदार्पण केले. हे दोघे गोलंदाजीबरोबर फलंदाजीही करतात, तर ध्रुव जुरेललाही प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
सुंदरची गोलंदाजी आणि त्याची फलंदाजी अशी त्याची अष्टपैलू कामगिरी पाहता खालची फलंदाजी फळी त्याच्या समावेशाने अधिक मजबूत होईल. सध्याच्या फॉर्मचा विचार करता सुंदर हा अनुभवी अश्विन आणि जडेजा यांच्यापेक्षा नक्कीच चांगला फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजा आणि अश्विनने न्यूझीलंडविरूद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती.
माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी अश्विन आणि जडेजा यांच्यापेक्षा सुंदरची निवड करण्याच्या भारताच्या निर्णयाचे समर्थन केले. स्टार स्पोर्ट्सवर ते म्हणाले, ‘मला वाटतं योग्य निर्णय घेतला आहे. तीन फिरकीपटूंपैकी तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. सुंदरने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत शानदार कामगिरी केली होती. भारताने मोठ्या खेळाडूंना वगळत अशा खेळाडूला संधी दिली आहे जो आपल्या कौशल्याच्या जोरावर चांगली कामगिरी करत आहे. कारण ऑस्ट्रेलियामध्ये टॉप ७ फलंदाजांमध्ये ३ डावखुरे खेळाडू आहेत.